

पणजी , पुढारी वृत्तसेवा : सेरुला कोमुनिदाद प्रकरणात लाखो चौरस मीटरपेक्षा जास्त जमिनींचे फसवे वाटप, हस्तांतरण आणि जमिनी हडप करण्यात आल्या आहेत . यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश असून मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते ट्रोजन डिमेलो यांनी केली आहे.
ट्रोजन म्हणाले की, सध्या 'एसआयटी' हा कागदी वाघ बनला आहे. यामुळे भाजपशी निष्ठा असलेल्या राजकीय दलालांना सौदे करण्यास मोकळीक देतो. एसआयटीच्या बैठकीनंतरही तिचे अधिकार क्षेत्र जाहीर करण्यात आलेले नाही. यामुळे सत्तेत असलेले लोक सहज फेरफार करू शकतात किंवा तपासावर नियंत्रण ठेवू शकतात.
ते म्हणाले की, तृणमूलने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की गुन्हे शाखेने जप्त केलेल्या 15 फायली त्वरित 'एसआयटी'कडे हस्तांतरित कराव्यात, ज्यामध्ये मंत्री आणि भाजप पदाधिकार्यांचा सहभाग असल्याचे सहज समोर येईल.