

पणजी; पुढारी वृत्तसेवा : युरोपातील यूके, ब्रिटनमधून गोव्यात येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गोवा सरकारच्या वारंवार केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देत केंद्र सरकारने भारतातील यूके प्रवाशांसाठी ई-व्हिसा पुनरुज्जीवित केला आहे. त्यामुळे गोव्यात युरोपीय देशातून येणार्या विशेषता यूकेमधील प्रवाशांसाठी ई- व्हिसा प्रकरणी तोडगा निघाल्याने येथील पर्यटक आता पुन्हा मोठ्या संख्येने गोव्यात येण्यास मदत होणार आहे.
दरम्यान गोवा ट्रॅव्हल व टुरीझम संघटनेचे अध्यक्ष निलेश शहा यांनी इ व्हिसा प्रकरणी केंद्राने दिलासा दिल्याबद्दल व त्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी निकराचे प्रयत्न केल्याबद्दल शहा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. इ व्हिसाला अडथळा ठरणारी सारी कलमे रद्द केल्याने यूकेमधून चार्टर आणि नियोजित फ्लाइट्सद्वारे अधिक पर्यटक गोव्यात येण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, ई-व्हिसाबाबत आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार विनंती केली होती; मात्र काही कारणास्तव ती पूर्ण झाली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत लक्ष घातल्याने आता ती मागणी पूर्ण झाली आहे. मी त्यांचे आभार मानतो. गोव्यासाठी यूके आणि रशियाचे पर्यटक महत्त्वाचे आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला मोलाची मदत होणार आहे.