पणजी; पुढारी वृत्तसेवा : ऑस्ट्रीयन चित्रपट अल्मा अँड ओस्कर ने 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ( इफफी) पडदा उघडणार आहे. डायटर बर्नर दिग्दर्शित हा चित्रपट एकूण 110 मिनिटांचा आहे. राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान इफफीचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट 20 रोजी पणजी येथील आयनॉक्समध्ये दाखवण्यात येईल.
या चित्रपटातून ऑस्ट्रियन संगीतकार, गायक अल्मा महलर (1879-1964) आणि चित्रकार , कवी ऑस्कर कोकोस्का (1886-1980) यांच्यातील उत्कट आणि तरल नातेसंबंध दाखवण्यात आले आहेत. संगीतकार आणि कलाकार यांच्यातील प्रेमसंबंध उलगडणार्या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे.
आपल्या पहिल्या नवर्याच्या मृत्यूनंतर अल्मा महलर हिचे वॉल्टर ग्रोपियस याच्याशी संबंध सुरू होतात. अशातच तिची ओळख उदयोन्मुख चित्रकार ऑस्कर कोकोस्का याच्याशी होते. यानंतर दोघांमध्ये ज्वलंत प्रेमसंबंध सुरू होतात. या नातेसंबंधांवरच कोकोस्का आपली सर्वात प्रसिद्ध कलाकृती चित्रित करतो. वादळी आणि तरल अशा नात्याचा आढावा या चित्रपटातून घेण्यात आला आहे.
दिग्दर्शक डायटर बर्नर हे प्रसिद्ध ऑस्ट्रियन चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक, अभिनेता व पटकथा लेखक आहेत. अल्पेनसागा या सहा भागातील कौटुंबिक आणि ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या चित्रपटांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख मिळाली. स्नित्झलर यांच्या डेर रीन या नाटकावर आधारि बर्लिनर रेगेन (2006) या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
यंदाच्या इफफीमध्ये भयपटांसाठी विशेष दुस्वप्न' विभाग सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात भयपटांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता आयोजकांनी हा विभाग सुरू करण्याचे ठरवले आहे. यामध्ये नाईट सायरन ( स्लोव्हाकिया ), ह्यूसेरा ( पेरू ) , व्हीनस ( स्पेन ) आणि हॅचिंग ( फिनलंड ) या चित्रपटांचा समावेश आहे.