गोवा : आता दारूही महागली; ‘मद्य पर्यटना’ला धोका!

दारू विक्री
दारू विक्री

पणजी; पिनाक कल्लोळी : कधीकाळी 'स्वतात मस्त दारू प्यायची तर गोव्यातच' ही राज्याची प्रतिमा येथील पर्यटनाला पूरक ठरत होती. मात्र गेल्या सव्वा महिन्यात गोव्यातील जास्त मद्यार्क (हार्ड लिकर) असणार्‍या दारूच्या दरात 5 ते 8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी गोव्यातील दारू आणि अन्य राज्यातील दारू यांच्या किमतीमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. शिवाय दिल्ली, हरियाणा, चंदीगड राज्यांमध्ये तर गोव्यापेक्षाही स्वस्त दारू मिळते. त्यामुळे गोव्यात दारू स्वस्त मिळते ही प्रतिमा बदलत चालल्याने येथील मद्य पर्यटनाला धोका निर्माण झाला आहेच, शिवाय स्थानिक मद्यविक्रेते चिंतेत आहेत.

राज्य सरकारने बीअरवरील अबकारी कर वाढवल्याने दारू विक्रीला फटका बसण्याची शक्यता आहे. सरकारने जास्त मद्यार्क (हार्ड लिकर) असणार्‍या दारूवरचे कर वाढविले नाहीत. मात्र, गेल्या सव्वा महिन्यात मद्यार्क कंपन्यांनी विविध कारणास्तव आधीच दर वाढविले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने जास्त मद्यार्क असणार्‍या कंपन्यांनी दारूच्या दरात सुमारे 30 ते 150 रुपयांनी वाढ केली आहे. यातील बहुतेक दारू ही लोकप्रिय ब्रॅण्डमधील आहे. या दरवाढीमुळे बाहेरच्या राज्यातील पर्यटक गोव्यातील दारू विकत घेण्यास कचरत आहेत. याबाबत कांदोळी येथील एका दारू विक्रेत्याने सांगितले की, बीअरचे दर पाच ते दहा रुपये वाढणार आहेत. महाराष्ट्राने विदेशी दारूचे दर कमी केल्याने अशा दारूचे गिर्‍हाईक आधीच कमी झाले आहेत. आता महाराष्ट्र सरकारने गोव्यातून दारू आणणार्‍यांवर मोक्का लावण्याचे जाहीर केल्याने येथून देशी बनावटीची विदेशी दारू नेण्याची संख्या खूपच कमी झाली आहे. पूर्वी पर्यटक 5 ते 6 बाटल्या नेत होते. आता त्यांना एक बाटली नेतानाही विचार करावा लागतो.

म्हापसा येथील आणखी एका विक्रेत्याने सांगितले की, आता गोव्यातील दारूचे दर हे दिल्ली, हरियाणा, चंदिगढपेक्षा जास्त आहेत. साहजिक स्वस्त दारू मिळते म्हणून येथे येणारे उत्तर भारतीय पर्यटक कमी झाले आहेत. सध्या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये गोव्यापेक्षा महाग दारू आहे. त्यामुळे त्या राज्यातील पर्यटक गोव्यात मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करताना दिसतात. पर्वरी परिसरातील एका बार आणि रेस्टॉरंट मालकाने सांगितले की, घाऊक दुकानात बीअर स्वस्त असल्याने आमचे ग्राहक आधीच कमी झाले होते. आता दरवाढीनंतर ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news