कारवार : पुढारी वृत्तसेवा : कारवार पालिका क्षेत्रातील रस्त्यावरील कोकणी भाषेतील फलकांना कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी काळे फासले. त्यांनी नगरपालिका आयुक्तांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध केला.
कारवार नगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील गल्ल्यांचे, रस्त्यांचे नामफलक कन्नड आणि कोकणीत लिहिले होते. कर्नाटकात फक्त कन्नड भाषेतच फलक लावणे बंधनकारक असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे कोकणीतील फलकांना काळे फासले, अशी माहिती मिळाली. चार दिवसांपूर्वी कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष प्रवीण शेट्टी यांच्या गटाकडून पालिका आयुक्त आर. पी. नाईक यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला होता.
रस्त्यावरील नामफलक मराठी, हिंदी भाषेत का लिहिले आहेत, असा जाब त्यांना विचारला होता. मराठीतील फलक हटवण्यास या संघटनेने सांगितले होते. त्यावर आयुक्तांनी हे फलक मराठीत नसून प्रशासकीय भाषा कन्नड आणि कोकणीमध्ये असल्याचा खुलासा केला होता.