अत्याधुनिक उपचारपद्धती लवकरच : विश्वजित राणे
पणजी : पुढारी वृत्तसेवा : मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने काम करणार आहे. येथे लवकरच अत्याधुनिक उपचारपद्धती सुरू करण्यात येतील, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले. आमदार व्हेंजी व्हिएगस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
व्हेंजी यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अतिदक्षता विभाग अपुरा पडत असल्याने डायलेसिस किंवा अन्य उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना गोमेकॉमध्ये जावे लागत असल्याचे सांगितले. केपेचे आमदार एल्टन डिकोस्टा आणि सभापती रमेश तवडकर यांनीही या इस्पितळात सोयी सुविधा अपुर्या असल्याचे सांगितले.
यावर राणे यांनी सांगितले की, इस्पितळाच्या डायलेसिस विभागात 12 आणि अतिदक्षता विभागात 9 खाटा आहेत. यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. इस्पितळासाठी 426 प्रस्तावित जागांसाठी केवळ 89 जागा मंजूर झाल्या आहेत. उर्वरित 337 जागांसाठी सरकार प्रयत्नशील आहे. याशिवाय येथे कॅथलॅब आणि न्यूरो विभाग सुरू करणार आहे. इस्पितळाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर परिचारिका महाविद्यालय करण्याचा विचार सध्या बाजूला ठेऊन येथे काही नवीन विभाग सुरू करण्यात येणार आहेत. हॉस्पिसीयो इस्पितळात पुनर्वसन आणि परिचारिका प्रशिक्षण विभाग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या आयुषमान भारत व अन्य योजनांचा उपयोग केला जाणार आहे.
दक्षिणेतील आमदारांसोबत बैठक
राणे यांनी सांगितले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या कमतरता जाणून घेण्यासाठी दक्षिणेतील सर्व आमदारांसोबत बैठक घेतली जाणार आहे. नवीन जागा मंजूर होत नाहीत तोपर्यंत कंत्राटी कर्मचारी घेण्यावर सरकार विचार करेल.

