

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मतचोरी म्हणजे नागरिकांच्या संविधानिक अधिकाराचे हनन आहे. फॉर्म-६ मध्ये बदल करून सत्ताधारी पक्षाकडून संविधानिक यंत्रणा भ्रष्ट करून त्याब्यात घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाराष्ट्राच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होत्या.
यावेळी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर आणि माध्यम प्रमुख हिमांशू उपस्थित होते. ठाकूर म्हणाल्या की, व्होट बचाव- देश बचाव आंदोलनाअंतर्गत मतचोरीबाबत घरोघरी जाऊन लोकांना समजावून सांगणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मतचोरी कशी नियंत्रित केली जाते हे समजावले जाणार आहेत.
त्याबरोबरच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीमाना दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. सत्ताधाऱ्यांनी मतचोरी करता यावी यासाठी निवडणूक आयोगासबंधी कायदाच बदलून टाकला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त मते, मतांचे डुप्लिकेशन आणि काढून टाकण्याच्या घटना वाढताना दिसत आहे. निवडणुकीत अतिरिक्त मते आली कुठून हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
भाजप उत्तरे का देते ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मत चोरी संबंधी जे प्रश्न उपस्थित केले त्याला भाजप का उतरे देत आहे असा सवाल करत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, भाजप आणि निवडणूक आयोग एक झालेत असे दिसते. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी पळवाट शोधली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.