

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षा देणे आमचे कर्तव्य आहे. पर्यटकांना रोहन खंवटे कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. विशेषतः महिलांची सुरक्षितता आणि सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिला आहे. दरम्यान, कळंगुट येथे महिलेला त्रास देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.
महिला पर्यटकाच्या छळाशी संबंधित अलीकडील घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री खंवटे म्हणाले, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तसेच व्यक्तींचा अपमान करणाऱ्या कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या विनयशीलतेचा भंग करणारे आम्हाला मान्य नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे तातडीने पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असून योग्य ती तत्काळ कारवाई करण्यात आल्याचे मंत्री खंवटे म्हणाले. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने बीच शंकजवळ एका महिला पर्यटकाचा मार्ग अडवून असभ्य वर्तन केल्याचे दिसून येते.
संबंधित व्यक्तीने अश्लील हावभाव केल्याने महिलेला त्रास झाला. पर्यटन विभागाने कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ७४, ७५, ७९ तसेच इतर संबंधित कलमांनुसार नोंदविण्यात आला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध : नाईक
या संदर्भात पर्यटन संचालक केदार नाईक यांनी सांगितले की, सर्व पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सन्मानपूर्ण वातावरण राखण्यास विभाग पूर्णतः कटिबद्ध आहे. पर्यटन विभाग स्थानिक प्रशासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांसोबत समन्वय साधून अशा घटनांवर तात्काळ कारवाई करतो. कोणत्याही प्रकारचा छळ किंवा गैरवर्तन कायद्यानुसार कठोरपणे हाताळले जाईल, जेणेकरून गोवा सुरक्षित आणि स्वागतार्ह पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.