Goa Coast | किनारपट्टीला पडतोय जलपर्णीचा विळखा

केळशी, मोबोर येथील प्रकार; पर्यटक, स्थानिकांना त्रास; करमणे पंचायतीची स्वच्छता
करमणे ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम.
करमणे ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम.
Published on
Updated on

मडगाव : शहरातील नदी-नाल्यांमधून वाहत येऊन मोबोर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या जलपर्णीमुळे केळशी आणि मोबोर किनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य झाकोळले आहे. पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत करमणेचे सरपंच डिक्सन वाझ यांनी पुढाकार घेत किनाऱ्याच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.

मोबोर समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. वर्षभर देश-विदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देतात. मात्र, अलीकडील मुसळधार पावसामुळे नदीमार्गे मोठ्या प्रमाणात जलपर्णी समुद्रात वाहून येऊन ती मोबोर किनाऱ्यावर साचली. त्यामुळे किनारे खराब झाले असून दुर्गंधीही पसरली. पर्यटकांना किनाऱ्यावर वावरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यटन व्यवसायावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम सुरू केली. सरपंच डिक्सन वाझ म्हणाले की, परिसराचे संरक्षण करण्याची जबाबदारी केवळ सरकारी यंत्रणांची नसून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचीही तितकीच आहे. परिस्थिती गंभीर असताना दोषारोप करण्यात वेळ घालविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणे अधिक महत्त्वाचे असल्याने ग्रामपंचायतीने स्वखर्चाने आणि विविध यंत्रणांच्या समन्वयातून ही मोहीम राबविली आहे.

करमणे ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम.
Ganesh Idol Registration | गणेशोत्सवासाठी मूर्ती नोंदणी १५ जुलैपासून

पर्यावरण संवर्धन, पर्यटन उद्योगाचे संरक्षण आणि गोव्याची स्वच्छ प्रतिमा कायम राखणे हेच या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेसाठी बीच क्लिनिंग एजन्सीची यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ कार्यरत असून मोठ्या प्रमाणात जलपर्णी हटविण्यात आली आहे. भरती-ओहोटी आणि सतत वाहून येणाऱ्या जलपर्णीमुळे कामात अडथळे निर्माण होत असले तरी किनारा पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा निर्धार पंचायतीने व्यक्त केला आहे.

स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या बीच क्लिनिंग एजन्सीच्या कर्मचाऱ्यांचे सरपंच डिक्सन वाज यांनी विशेष कौतुक केले. कठीण परिस्थितीत सातत्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलपर्णी हटविणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आवश्यक सहकार्य केल्याबद्दल पर्यटन खात्याचे आभारही त्यांनी मानले.

करमणे ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात आलेली स्वच्छता मोहीम.
Goa - मुरगावातील 160 वारकऱ्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान

नेतृत्व म्हणजे सबबी देणे नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जबाबदारी स्वीकारणे होय. पर्यावरण संवर्धन, पर्यटनाचे संरक्षण आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य जपण्यासाठी किनाऱ्यावरील जलपर्णी हटविण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

- डिक्सन वाझ, सरपंच, करमणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news