सासष्टीः पुढारी वृत्तसेवा
जानेवारी २०२३ मध्ये वास्को येथे घडलेल्या एका जीवघेण्या रस्ते अपघाताच्या प्रकरणात, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने रुमडावाडा (मुरगाव) येथील अमर शेटकर हारमलकर याला दोषी ठरवले आहे.
या अपघातात ६८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी २०२३ रोजी वरुणापुरीकडून हरमलकर हा दाबोळी विमानतळाच्या दिशेने कारने जात होता. त्यावेळी साई नगर येथील तटरक्षक दलाच्या निवासी क्षेत्राजवळ त्याने भरधाव वेगाने वाहन चालवत रस्ता ओलांडणाऱ्या, वास्को येथील फकीर गल्ली येथील मुजावर नामक पादचाऱ्याला धडक दिली व तो घटनास्थळावरून पळून गेला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.
त्यानंतर मुजावर यांचा चिखली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्यायालयाने हारमलकर याला भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ आणि ३०४-अ अन्वये, तसेच "मोटार वाहन कायद्या"तील संबंधित तरतुदींनुसार दोषी ठरवले. कलम ३०४-अअन्वये त्याला तीन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि ४० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इतर कलमांखालील शिक्षा ही या शिक्षेसोबतच एकाच वेळी भोगावी लागेल. पीडित महिलेच्या कायदेशीर वारसांना नुकसानभरपाई दिली जाईल.