

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
येथील मासे मार्केटामध्ये मंगळवारपासून (दि. १३) मासे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. मात्र, या मार्केटाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या भाजी, फळे व इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांपैकी काहीजणांनी नवीन मार्केटात व्यवसाय सुरू केला आहे.
मात्र काहीजण जुन्या ठिकाणी अद्याप व्यवसाय करीत आहेत. मात्र, त्या सर्वांना तेथे जावेच लागणार, असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर यांनी सांगितले. मुरगाव पालिकेतर्फे सर्व सोयीयुक्त मार्केट बांधण्यात आले आहे.
या मार्केटाचे उद्घाटन नगरविकास मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते १० रोजी करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. १३) तेथे मासे विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. वास्कोच्या नविन मासळी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांनी उत्साही वातावरणात एन्ट्री मारली मंगळवारी पहाटेपासून मासळी विक्री करण्यास सुरुवात केली.
या मासळी मार्केटामध्येच पहिल्या मजल्यावर भाजी, फळ बइतर वस्तू विक्रेत्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे साळगावकर इमारतीसमोरच्या पदपथावर तसेच एफ, एल गोम्स मार्गालगतच्या पदपथावरील भाजी, फळ, नारळ तसेच इतर वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना तेथे हलविण्यात येणार आहे.
काहीजणांनी तेथे स्थलांतर केले आहे. इतर काहीजण लवकरच तेथे जाणार आहे, असे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले. तेथील जागा महसूल खात्याची असल्याने तसेच महसूल खात्यातर्फे तेथे उपजिल्हाधिकारी, कार्यालयासाठी इमारत मामलेदार बांधण्यात येणार असल्याने तेथील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात येणार असल्याचे बोरकर म्हणाले.
परिसर गजबजला
मासे घेण्यासाठी आलेल्या मासे खवय्यामध्येही मासळी घेण्यासाठी उत्साह दिसून आला. पालिकेने काल दिलेल्या आदेशानुसार मंगळवारपासून मासळी विक्रेत्यांनी वास्कोतील नवीन मासळी मार्केटमध्ये मासळी विक्री करण्यास सुरुवात केली. नवीन मार्केट प्रकल्प परिसर गजबजून गेलेला दिसला, मासळी घेण्यासाठी आलेल्या लोकांच्या चेहप्यावरही हास्य उमटलेले दिसत होते.
जागेसाठी धडपड
नवीन मासे मार्केट बांधण्यापूर्वी जुन्या मार्केट परिसरात भाजी, फळे, नारळ विकणाऱ्या विक्रेत्यांना नवीन मार्केटात प्राधान्य देण्यात आहे. असे समजते. त्यामुळे इतरांनीही त्या मार्केटात जागा मिळावी यासाठी धावपळ सुरू केली आहे.
पाणी निचरा होत नसल्याचे कारण
सुरू झालेल्या मासळी मार्केटमध्ये फरशीवर पडलेले पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी साचते. पाणी साचून राहिल्याने त्याला दुर्गंधी येईल, असे काहीजणांनी सांगितले. ही समस्या तसेच इतर समस्या हळूहळू दूर करण्याची गरज आहे. ग्राहकांना या मार्केटामध्ये मोकळेपणाने फिरता येत असल्याने ग्राहक सुखावले आहे.