

दाबोळी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील पालिकेच्या मॉडर्न मार्केटमध्ये बुधवारी रात्री लागलेल्या आगीत अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आता या नुकसानग्रस्त दुकानदारांचे मासळी मार्केटच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे माहिती मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडवेलू यांनी दिली.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडवेलू यांनी आमदार कृष्णा साळकर, आमदार संकल्प आमोणकर आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी मॉडर्न मार्केट संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल डिसोझा आणि सचिव दयाराम केवड उपस्थित होते.
नुकसानग्रस्त दुकानदारांच्या साहित्याचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी पालिकेवर सोपवली. त्यानुसार मॉडर्न मार्केटमधील अंदाजे दोनशे दुकानदारांचे वास्को मासळी मार्केटच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडवेलू यांनी सांगितले. नुकसानग्रस्तांना सरकारकडून तातडीने आर्थिक मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मॉडर्न मार्केट संघटनेचे अध्यक्ष मॅन्युएल डिसोझा यांनी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. सरकारकडून सर्वतोपरी मदत मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सचिव दयाराम केवड यांनीही आमदार कृष्णा साळकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरविकासमंत्री राणे यांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.
विरोधकांनी घटनास्थलळी येऊन राजकारण करण्याऐवजी नुकसानग्रस्त दुकानदारांना सहकार्य करायला हवे होते, असे साळकर म्हणाले. आमदार संकल्प आमोणकर यांनीही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली एकाही दुकानदाराला आर्थिक मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही, असे सांगितले. भाजपाचे प्रदेशध्यक्ष दामू नाईक यांनीही नुकसानग्रस्त दुकानदारांची भेट घेऊन सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले. माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर आणि गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीषा खलप यांनीही घटनास्थलळी पाहणी केली.
मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडवेलू यांनी गुरुवारी मॉडर्न मार्केटची पाहणी केली. त्यांच्यासमवेत पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि इतर अधिकारी होते. पाहणीनंतर मुख्य सचिवांचे वाहन बाहेर येताच युरी आलेमाव यांनी ते अडवून आगीचे कारण आणि आपल्याला घटनास्थलळी जाण्यापासून का रोखण्यात आले, याबाबत प्रश्न विचारले. मात्र, मुख्य सचिवांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची आणि उच्चस्तरीय समिती नेमून आगीच्या कारणांची चौकशी करण्याची मागणी केली. मॉडर्न मार्केटच्या इमारतीच्या संरचनात्मक स्थिरता अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर आणि इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.