

करमाळा : पुढारी वृत्तसेवा
पोटच्या दोन जुळ्या मुलांना विहिरीत टाकून हत्या केल्याची धक्कादायक व सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तुर गावामध्ये घडली आहे. शिवांश (वय ७ वर्षे) व श्रेया जाधव (वय ७वर्षे) अशी या दुर्देवी मृत मुलांची नावे आहेत.
सुहास ज्ञानदेव जाधव (वय ३२) असे त्या निर्दयी बापाचे नाव आहे. करमाळा तालुक्यातील झरे येथे जाधव हा विद्युत ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून राग आल्याने आज सकाळी त्याने आपल्या पोटच्या दोन जुळ्या मुलांना रेल्वे स्टेशन शेजारी असणाऱ्या विहिरीत फेकून त्यांची हत्या केली. हे कृत्य केल्यानंतर त्याने काही वेळातच घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वजण विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व संपले होते.
दोन्हीही चिमुकल्यांचे प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बापाने निर्दयपणे हत्या केलेली ही दोन्ही मुले जुळी होती. याबाबत करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालू होती. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.