Goa |तक्रार द्यायला गेला अन् पोलिसांकडून मारहाण; मोईन खानने संपवले जीवन, वाळपईत जनक्षोभ

मोईन खान प्रकरण; निरीक्षक, उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी
goa
वाळपई : जाब विचारण्यासाठी पोलिस ठाण्यावर जमा झालेले नागरिक
Published on
Updated on

वाळपई : प्रेमसंबंधातून झालेल्या वादात तक्रार द्यायला गेलेल्या तरुणालाच पोलिसांनी अटक करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप वाळपई येथे करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रचंड नैराश्यात असलेल्या मोईन खान या तरुणाने बुधवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद शुक्रवारी उमटले असून, संतप्त नागरिकांनी वाळपई पोलीस ठाण्यावर मोर्चा नेत दिवसभर ठिय्या आंदोलन केले. संबंधित पोलिस निरीक्षक विद्देश शिरोडकर आणि उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जमावाने लावून धरली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोईन खान याचे वाळपईतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. या रागातून तरुणीच्या पालकांनी आणि तिच्या दुसऱ्या एका प्रियकराने मोईनला मारहाण केली. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी मोईन रविवारी रात्री वाळपई पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदार मोईन खान यालाच अटक केली. पोलीस कोठडीत उपनिरीक्षक प्रथमेश गावस यांनी त्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांच्या अमानुष वागणुकीमुळे मोईन खान प्रचंड मानसिक दडपणाखाली होता. पोलिसांनी शरीरावर केलेल्या मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. या अपमानास्पद वागणुकीमुळे आणि पोलिसांच्या पक्षपातीपणामुळे मोईनने चार दिवस स्वतःला घरात कोंडून घेतले. अखेर बुधवारी रात्री त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांनी वेळीच तक्रार नोंदवून गुन्हेगारांवर कारवाई केली असती, तर मोईनने हे पाऊल उचलले नसते, असा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

goa
Goa heatwave 2026 |एप्रिल महिना सर्वाधिक तापमानाचा

शुक्रवारी सकाळी मोईनच्या कुटुंबीयांनी आणि शेकडो नागरिकांनी वाळपई पोलीस ठाण्याला घेराव घातला. गुरुवारी तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी उद्धटपणे हाकलून लावल्याने जनक्षोभ अधिकच उसळला. जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही आणि त्यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यावरून हलणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. यामुळे वाळपई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

goa
Goa robbery case | बहुराज्यीय शोधमोहिमेनंतर दरोडेखोर जाळ्यात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news