

उसगाव : पुढारी वृत्तसेवा
उसगाव ग्रामपंचायत क्षेत्रात वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन सेवा सुरू करण्यात आली असून शास्त्रीय पद्धतीने कचरा व्यवस्थापन राबविणारे उसगाव हे राज्यातील पहिले गाव, तर वाळपई हे पहिले शहर ठरल्याचा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला. उसगाव पंचायत सभागृहात या उपक्रमाचा प्रारंभ मंत्री राणे यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, उसगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक घराला ओला व सुका कचरा वेगळा साठविण्यासाठी दोन कचरा पेट्या आपण स्वखर्चातून उपलब्ध करून देणार असून त्यासाठी पंचायतीवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
या उपक्रमामुळे उसगाव आणि वाळपई 'शून्य कचरा' क्षेत्र बनविण्याचे उद्दिष्ट असून नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच मोबाईल ॲपही सुरू करण्यात येणार आहे. पाचावाडा-उसगाव येथे आजपासून आणीबाणी कक्ष (एमर्जन्सी रूम) कार्यान्वित करण्यात आला असून येत्या सोमवारी या भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल.
त्याच दिवशी २० नव्या रुग्णवाहिकांचेही लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उसगाव हे सेन्सस टाऊन असल्याने त्या दृष्टीने विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. कोमुनिदादकडून ७ हजार चौरस मीटर जागेचा ना हरकत दाखला मिळाला असून तेथे आधुनिक सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे.
यावेळी शहरी विकास व नगरपालिकांचे संचालक ब्रिजेश मणेरकर, वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन सेवा यंत्रणेचे वरिष्ठ अभियंता हुसेन एस. मुझावर, व्यवस्थापकीय संचालक गौरव पोकळे, गटविकास अधिकारी आश्विन देसाई, जि. पं. सदस्य समीक्षा नाईक, सरपंच राजेंद्र नाईक, उपसरपंच संगीता डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे आदी उपस्थित होते.