

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
केपे येथे शासनाच्या नव्या पोलिस स्थानकासाठी उभारण्यात येत असलेली बहुमजली इमारत अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत पडून असल्याने ती सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका बनल्याचे समोर आले आहे.
गोवा कॅनच्या पाठपुरावा नंतर आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, केपे नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांनी केपे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. सोकोरो कार्दोज यांना पत्र पाठवून अपूर्ण इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, साचलेला बांधकामाचा कचरा आणि पावसाळ्यात विविध ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होण्याचा धोका असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर कीटकजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. तसेच इमारत सापांचे आश्रयस्थान बनत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले होते.
गोवा कॅनने सार्वजनिक आरोग्य कायदा १९८५ आणि नियम १९८७ अंतर्गत संबंधित कंत्राटदार व प्रकल्प यंत्रणेला नोटीस बजावावी, बांधकाम परवानग्यांचा माहितीफलक लावावा, नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे, अशी मागणी केली होती. या पत्राच्या प्रती मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, आरोग्य सचिव, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी, आरोग्य सेवा संचालक, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे उपसंचालक, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक आणि केपे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या होत्या.
या निवेदनाची दखल घेत आरोग्य अधिकारी डॉ. सोकोरो कार्दोज यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, केपे नगरपालिका आणि केपे पोलिस स्थानकाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी आयोजित केली. यावेळी डॉ. कार्दोज, स्वच्छता निरीक्षक जयकुमार नाईक, गोवा कॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता प्रीती नाईक, पोलिस उपनिरीक्षक योगेश गावकर, नगर अभियंता नितीन कोठारकर, नगर निरीक्षक राजेश नाईक आणि पर्यवेक्षक चंदन कुमार उपस्थित होते.
पाहणीदरम्यान इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याचे, बांधकामाचा कचरा साचल्याचे आणि चार मजली इमारतीत प्रवेश करणे अत्यंत कठीण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना इमारतीच्या विविध मजल्यांवर पाणी साचले आहे का, डासांची उत्पत्ती होत आहे का किंवा अन्य आरोग्यविषयक धोके निर्माण झाले आहेत का, याची तपासणी करणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
संयुक्त पाहणीनंतर सर्वप्रथम परिसरातील झाडेझुडपे हटविणे, बांधकामाचा कचरा साफ करणे आणि संपूर्ण इमारतीची स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधून सेप्टिक टँक व इतर भूमिगत पाणीसाठ्यांची माहिती घेणे, वीज व पाणीपुरवठा विभागाकडून जोडण्यांची पडताळणी करणे असे ठरविण्यात आले आहे.
गोवा कॅनने सरकारी बांधकाम प्रकल्पांमध्ये आवश्यक परवानग्या, ना-हरकत दाखले आणि देखभाल याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक इमारती वर्षानुवर्षे अपूर्ण अवस्थेत पडून राहतात, असा मुद्दा उपस्थित केला. अशा इमारती कालांतराने आरोग्यासाठी धोकादायक तसेच अपघातप्रवण ठिकाणे बनतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य संचालनालय आणि नगर प्रशासन संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अशा प्रकल्पांसाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले.
केपेतील नव्या पोलिस स्थानकाचे बांधकाम दीर्घकाळ रखडल्याने सरकारी निधी अडकून पडण्याबरोबरच अपूर्ण इमारत नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने परिसर सुरक्षित करून रखडलेला प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.