

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
ही गोष्ट आहे ३६ गुण जुळलेल्या एका लग्नाची. लग्न झाल्याच्या २४ तासांतच असे काही अनुभव विवाहित युवकाला आले की 'क्या से क्या हो गया, बेवफा...' म्हणत त्याने न्यायासाठी थेट पोलिस ठाणे गाठले. वयोवृद्ध आई-वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सासष्टीतील हा युवक विवाहासाठी तयार झाला.
एसी टेक्निशियन असलेल्या या युवकाने 'सगळे व्यवस्थित होईल' या विश्वासावर विवाह जुळवणाऱ्या मध्यस्थाला तब्बल १५ हजार रुपये मोजले. केपे तालुक्यातील पण सध्या मुंबईत नोकरी करणाऱ्या युवतीशी ऑगस्टमध्ये जुळवाजुळव झाली. पण, वर वर छान दिसणारे चित्र अचानक बदलले.
ख्रिश्चन पद्धतीनुसार विवाहपूर्व कौन्सिलिंगही पार पडले. मात्र, रोस (हळद) समारंभाच्या दिवशी अचानक कथेत एण्ट्री झाली मुंबईस्थित 'मित्रा'ची! बम्बय से आया हा दोस्त समारंभात इतका सक्रिय होता की, वर आहे की मित्र, असा प्रश्न उपस्थितांनाच पडू लागला. चर्चमधील विवाहप्रसंगी वर बाजूला आणि मित्र जवळ, अशी दृश्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. विवाहानंतरचा खरा धक्का मात्र रात्री बसला.
मधुचंद्राची तयारी करत असताना वधूने पतीला थेट बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर वराच्या घरी जाण्याऐवजी 'आपण हॉटेलमध्येच राहू' असा आदेश देत वधू बहीण व मित्रासोबत हॉटेलात मुक्कामाला गेली. सहा महिन्यांत कधीही दारू न पिणारी वधू हॉटेलात मात्र बियरवर तुटून पडल्याचा आरोप आहे.
दारूला विरोध करणाऱ्या पतीला मारहाण झाली, इतकेच नव्हे तर या गोंधळात त्याच्या आईवरही हात उचलण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अखेरीस "लग्न टिकवायचे की जीव?" असा प्रश्न पडल्याने संबंधित युवकाने पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले आहे.