

पणजी : पुढारी वृत्तसेवा
बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले 'तहलका' मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. आत्मसमर्पणातून सूट मिळावी, यासाठी तेजपाल यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत त्याला तीन आठवड्यांच्या आत शरणागती करण्याचे निर्देश दिले.
तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवून दहा वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, आपले अपील सुनावणीसाठी घेतले जाण्यापूर्वी तुरुंगात शरणागती करण्यापासून सूट मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही. शरणागती केल्याचे प्रमाणपत्र २१ सप्टेंबर २०२७ पूर्वी सादर केल्यास त्याने शिक्षेला आव्हान दिलेली फौजदारी याचिका २२ सप्टेंबर २०२७ रोजी सुनावणीस ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणात तेजपाल त्याच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी करणारी स्वतंत्र याचिकाही गोवा सरकारने दाखल केली आहे.
तेजपाल याच्या मागणीला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला. आत्मसमर्पण केल्याशिवाय त्याच्या अपिलाचा विचार किंवा सुनावणीसाठी त्याची नोंद करता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे तेजपाल यांनी आधी न्यायालयाच्या आदेशानुसार आत्मसमर्पण करणे आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले.