

पणजी : पुढारी वृत्तसेवा
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाअंतर्गत तिसवाडी तालुक्यात राबविण्यात आलेल्या वाहतूक खात्याच्या वन स्टॉप उपक्रमातून एकूण १४६ अर्जदारांना वाहन प्रशिक्षणार्थी परवाने (लर्निंग लायसन्स) वितरित करण्यात आले. ही मोहीम उत्तर गोवा वाहतूक विभाग, पणजी येथील सहायक संचालकांच्या कार्यालयामार्फत राबविण्यात आली.
'सरकार तुमच्या दारी' या उपक्रमांतर्गत नागरिकांना परवाना व संबंधित वाहतूक सेवा त्यांच्या दारातच मिळाव्यात, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत १५ ग्रामपंचायती तसेच पणजी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाच प्रभाग समूहांचा समावेश होता.
या उपक्रमाअंतर्गत एकाच ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी स्टॉल्स उभारून सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज भासली नाही, असे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आझोशी मंडुर ग्रामपंचायतीत सर्वाधिक ३२ अर्जदारांनी सहभाग घेतला, त्यापैकी ३१ जणांना प्रशिक्षणार्थी परवाने देण्यात आले.
सां मातियशमालार ग्रामपंचायतीत १९ अर्जदार, कुंभारजुवे येथे १६, चोडण येथे २० अर्जदारांना वाहन प्रशिक्षणार्थी परवाने देण्यात आले. सांताक्रूझ आणि नेवरा ग्रामपंचायतीत प्रत्येकी ९ अर्जदारांना परवाने मंजूर करण्यात आले.
बहुतेक ठिकाणी अर्जदारांची संख्या आणि दिलेल्या प्रशिक्षणार्थी परवान्यांची संख्या जवळपास समान असल्याने या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडक ठिकाणी कागदपत्रे पडताळणी तसेच इतर परवाना संबंधित सहाय्य सेवाही पुरविण्यात आल्या. पणजी शहरातील प्रभागांमध्ये राबविण्यात आलेल्या शिबिरांत १२ अर्जदारांना वाहन प्रशिक्षणार्थी परवाने देण्यात आले.