

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील पारंपरिक काजू उद्योगाला नवे बळ देणारा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा ४ था गोवा काजू महोत्सव यंदा १०, ११ आणि १२ एप्रिल रोजी पणजीत आयोजित करण्यात आला आहे.
यंदाच्या महोत्सवात उपजीविका बळकटीकरण उपक्रमाचा प्रचार आणि गोव्यातील काजूच्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येणार आहे. या महोत्सवामध्ये काजू लागवड, प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यामध्ये कार्यरत असलेल्या शेतकरी, उद्योजक, स्वयं-सहायता गट आणि तरुण नव उद्योजकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. नवोन्मेष, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित हा महोत्सव गोव्यातील काजू उद्योगाला भविष्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
काजूपासून होणाऱ्या विविध तयार उत्पादनांचे प्रदर्शन, स्थानिक उत्पादकांना व्यासपीठ, तांत्रिक सत्रे, चर्चासत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गोव्याची काजू संस्कृती अधोरेखित केली जाणार आहे. ग्रामीण गोवा काजू महोत्सव हा केवळ एक उत्सव न राहता, गोव्याच्या अर्थव्यवस्थेला सक्षम करणारा आणि पारंपरिक वारशाला आधुनिकतेची जोड देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.