

पणजी : पुढारी वृत्तसेवा
माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम आहे. पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी न सोडण्याचे विधान केले आहे. दुसरीकडे, उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारीचे ठोस आश्वासन हवे असण्याने त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा तिढा कायम आहे.
२०२२ मध्ये भाजपने पणजीची उमेदवारी नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना ६,०७१ मते मिळाली, तर विजयी उमेदवार बाबुश मोन्सेरात यांना ६,७८७ मते मिळाली. उत्पल पर्रीकर यांचा अवघ्या ७१६ मतांनी पराभव झाला होता.
२०२७ ची विधानसभा निवडणूक जवळ येत असताना भाजपपने पक्षाचे जुने नेते पुन्हा पक्षात यावेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चेसाठी बोलावले होते.
पार्सेकर मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, पणजीतून उमेदवारीचे ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उत्पल पर्रीकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रंनी दिली.
उत्पल पर्रीकर यांना पणजीतून उमेदवारी दिल्यास बाबुश मोन्सेरात यांना ताळगाव किंवा सांताक्रुझमधून निवडणूक लढवावी लागू शकते. 'उत्पल यांच्या भाजप प्रवेशाचे स्वागत आहे; पण आपणास पणजी सोडण्यास कोणीही सांगू शकत नाही,' असे विधान मोन्सेरात यांनी केले आहे. त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांना ताळगावहून निवडणूक लढवायची असल्याने पणजीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याशिवाय उत्पल यांच्या प्रवेशातील अडचणी कायम राहण्याची शक्यता आहे.