

साखळी : पुढारी वृत्तसेवा
साखळी मतदारसंघातील सुर्ल ग्रामपंचायतीची रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) आयोजित ग्रामसभा सभागृहात निर्माण झालेल्या प्रचंड वादामुळे अवघ्या तासाभरात तहकूब करण्यात आली. गावातील महत्त्वाचे सीआरझेड आणि खाणविषयक प्रश्न चर्चेला येत असतानाच पंचायत कार्यालयासमोर पोलीस उपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून सभागृहात वाद निर्माण झाला.
त्यामुळे ग्रामसभेचे कामकाज पुढे सुरू ठेवणे शक्य झाले नाही आणि सभा तहकूब करण्यात आली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामसभेच्या सुरुवातीला सचिव देसाई यांनी विषयपत्रिकेवरील विषय ग्रामस्थांसमोर मांडण्यास सुरुवात केली. गावातील सीआरझेड आणि खाणविषयक प्रश्न चर्चेला येताच सभागृहातील वातावरण तापले.
खाणविषयक मुद्दे तसेच पंचायत कार्यालयासमोर पोलिसांची उपस्थिती यावरून ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला. परिणामी ग्रामसभेचे कामकाज थांबवून सभा तहकूब करण्यात आली, अशी माहिती उपसरपंच सुभाष फोंडेकर यांनी दिली.
यावेळी सरपंच सुचिता नाईक गावकर, उपसरपंच सुभाष फोंडेकर, पंच भोला खोडगीणकर, दिनेश मडकईकर, विश्रांती सुर्लकर आणि साहिमा गावडे उपस्थित होते. निरीक्षक म्हणून उत्कर्षा गवंडे यांनी काम पाहिले.
पंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह...
ग्रामसभा ही केवळ औपचारिकता नसून गावातील नागरिकांना प्रश्न मांडण्याचे, विकासकामांबाबत माहिती घेण्याचे आणि प्रशासनाला जाब विचारण्याचे लोकशाही व्यासपीठ आहे. मात्र, बैठक तासाभरात तहकूब झाल्याने पंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढील ग्रामसभेत तरी प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर सविस्तर चर्चा व्हावी, नागरिकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि कामकाज अधिक पारदर्शक व जबाबदार पद्धतीने चालावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. गावातील अनेक महत्त्वाचे आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न चर्चेला येऊ नयेत, यासाठीच ग्रामसभा घाईघाईने आटोपण्यात आल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
गावाच्या विकासाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, अवघ्या तासाभरात सभा तहकूब झाल्याने अनेक ग्रामस्थांना आपली मते मांडण्याची संधी मिळाली नाही. तसेच उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून उत्तरे मिळवण्याची संधीही त्यांना मिळाली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.