

पणजी : पुढारी वृत्तसेवा
मुरगाव बंदर प्राधिकरणच्या (एमपीए) जागेवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका मागे घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने ती निकाली काढली.
सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने ती मंजूर केली; मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशावर कोणतीही अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पुतळा हटविण्याबाबतचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सध्या कायम राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आवश्यक असल्यास आदेशात बदल किंवा मुदतवाढ मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अर्ज करण्याची मुभा दिली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेला पुतळा हटविण्याचे आदेश दिले होते.
तसेच, गरज भासल्यास पुतळा हटविण्याची कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले होते. सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने उच्च न्यायालयाचा आदेश कायम राहिला असून, या प्रकरणातील पुढील कारवाई आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील सुनावणीवर अवलंबून राहणार आहे.