

धावे : पुढारी वृत्तसेवा
गोवा क्रिकेट संघाच्या वरिष्ठ महिला संघातील सदस्य सुंदा यत्रेकर यांची अष्टपैलू कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. सत्तरीसारख्या ग्रामीण भागात फक्त एक-दोन महिला क्रिकेट खेळतात; पण सुंदा यत्रेकर यांची झेप ही फार मोठी आहे. कुठेही क्षेत्र हे महिलांसाठी अशक्य नाही. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी क्रिकेटमध्ये यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे.
सत्तारी तालुक्यातील प्रथितयश महिला क्रिकेटटर सुंदा यत्रेकर यांचा जन्म शेळप या नगरगाव पंचायत क्षेत्रातील एका ग्रामीण भागात झाला. लहानपणापासूनच त्यांना खेळाची आवड होती. प्राथमिक शाळेमध्ये शिकताना त्यांनी चुणूक दाखवली होती. शाळेतील मुलांबरोबर खेळताना याची झलक तिच्या पालकांना पाहायला मिळत होती.
पुढे वाळपई येथील अवरलेडी हायस्कूल येथे त्यांनी माध्यमिक स्तरचे शिक्षण घेतले. बीपीईडी शिक्षण त्यांनी मिरज (जि. सांगली, महाराष्ट्र) येथे जाऊन घेतले. त्यावेळी वाळपईमध्ये क्रिकेटच्या सरावसाठी सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या.
तरीही त्यांनी न मागे पडता पदरमोड करून सलावासाठी पणजी, पर्वरी या ठिकाणी जाऊन गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. वाळपईतून पर्वरीपर्यंत बसने जाऊन सराव करून पुन्हा यायचे हे निश्चितच कष्टाचे होते. पण त्यांनी प्रशिक्षणात सातत्य ठेवले. हे करीत असताना साखळी महाविद्यालयामध्ये त्यांनी बीए ही पदवी घेतली. २००७ पासून त्या गोवा क्रिकेट टीमच्या महिला क्रिकेट टीमच्या सदस्य आहेत.
फिर्की गोलंदाजीने अनेकांची भंबेरी
उत्कृष्ट उजव्या हाताच्या फलंदाज म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर फिर्की गोलंदाज म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. मुख्यत्वे करून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून क्रिकेट संघामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने त्यांनी भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवलेली आहे. आपल्या कामगिरीमुळे त्यांनी गोवा महिला क्रिकेट टीममध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवलेला आहे.
दक्षिण विभागीय क्रिकेट टीमच्या त्या सदस्य आहेत. २०१४-१५ चा क्रिकेट हंगामामध्ये गोवा क्रिकेट संघाच्या कॅप्टन म्हणूनही त्या कार्यरत होत्या. क्रिकेटच्या तिन्हीही प्रकारांमध्ये मिळून त्यांनी २००हून जास्त सामन्यांमध्ये गोवाच्या महिला संघामध्ये प्रतिनिधित्व केले आहे. २०० हून जास्त फलंदाजांना बाद करण्याची किमियासुध्दा त्यांनी साध्य केली आहे. बऱ्याच वेळेला उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, सामन्याचा मानकरी, सामनावीर, मालिकावीर, असे पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेले आहेत. पूर्वी महिला क्रिकेटला दुय्यम स्थान दिले जात होते. पण आता पुरुष क्रिकेट संघासोबतच महिला संघालासुद्धा समान सन्मान मिळत आहे.
धर्मशाळा येथे त्यांनी क्रिकेटच्या कोचिंचे धडे घेतलेले आहेत. पुढे जाऊन त्या महिला क्रिकेट प्रशिक्षक होण्याचा मानस आहे. महिला क्रिकेट सदस्य असलेल्या त्यांच्या टीमने एक वेळ ईडन गार्डन मैदानावर कोलकत्ता येथे जाऊन बंगाल संघाला हरविण्याची किमिया साध्य केलेली आहे. त्या विजेता संघाच्या त्या सदस्य होत्या. २००२ पासून त्या गोवा क्रिकेट संघाच्या सदस्य आहेत.