Srinivas Nayak Firing Case| कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर प्राणघातक हल्ला; नेम चुकल्याने थोडक्यात बचावले

Srinivas Nayak Firing Case| दोन्ही हल्लेखोर पसार : चार पथकांकडून संशयिताचा शोध सुरू
श्रीनिवास नायक
श्रीनिवास नायक
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
परवरी येथील कॅसिनो मॅजेस्टिक परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या गोळीबाराने राज्यात खळबळ उडाली आहे. कॅसिनो ग्रुपचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करून दोन अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात नेम चुकल्याने नायक बचावले. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा रक्षकांनीही गोळीबार केला.

श्रीनिवास नायक
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. गोवा पोलिसांच्या चार पथकांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. परंतु, अद्याप पोलिसांचे हात रिकामेच आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोर हे गोव्याबाहेरील "सुपारी किलर" असण्याची शक्यता आहे.

मात्र, त्यांची ओळख, तसेच ते सध्या नेमके कुठे आहेत, याचा अद्याप पोलिसांना ठावठिकाणा लागलेला नाही. या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असून, हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोरांना कोणी सुपारी दिली होती का, याचाही शोध घेतला जात आहे.

तीन फेरी, सुरक्षा रक्षकाचा प्रतिहल्ला

घटनेनंतर श्रीनिवास नायक यांनी पोलिसांना माहिती दिली. नायक म्हणाले, मी कारमध्ये बसण्याच्या तयारीत असताना दोन हल्लेखोरांनी माझ्या दिशेने तीन फेरी झाडल्या. त्यावेळी माझ्या सुरक्षा रक्षकाने प्रत्युत्तरादाखल तीन फेरी झाडल्या.
सुरक्षा रक्षकाने गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी महामार्ग ओलांडून तेथून पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, हल्लेखोर कोणत्या दिशेने आले आणि कोणत्या मार्गाने पसार झाले, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सहभागी असलेल्यांना लवकरच अटक : मुख्यमंत्री

गोव्यासारख्या शांत राज्यात अशा प्रकारच्या घटना सरकार आणि पोलिस खाते खपवून घेणार नाही. घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना लवकरात लवकर अटक केली जाईल. पोलिस महासंचालकांना संशयितांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हल्ल्यामागील कारणही लवकरच समोर येईल. माझ्या कार्यकाळात प्रथमच एका उद्योजकावर गोळीबार झाला असल्याने या प्रकरणाबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

श्रीनिवास नायक
ST Political Reservation | "एसटी राजकीय आरक्षणासाठी 13 ऑगस्टला 'चलो पणजी'! 'उटा' संघटनेचा सरकारला थेट इशारा"

गोव्याबाहेरही तपास सुरू : महासंचालक

परवरी गोळीबारप्रकरणी गोवा पोलिसांकडून गोव्यासह गोव्याबाहेरही तपास सुरू असल्याची माहिती पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली. यासाठी चार पथके तैनात करण्यात आली असून, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यान्वये संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती देता येणार नसल्याचे अलोक कुमार यांनी स्पष्ट केले.

एफआयआर

कॅसिनो गोळीबार प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. श्रीनिवास नायक यांनी तक्रारीत संशयित म्हणून तूर्तास कोणाचेही नाव दिलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news