

पणजी : पुढारी वृत्तसेवा
शहरामधूनच जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे परवरीवासियांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी गिरी ते अटलसेतू असा उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यामुळे अवजड आणि वेगवान वाहने थेट जातात. तर खालील रुंद आणि मोकळा रस्ता असल्याने तेथूनही वाहने वेगाने हाकली जातात. त्यामुळे पुलाखालून प्रवास करणेही धोकादायक ठरत आहे.
उड्डाणपुलामुळे अवजड वाहनांची घरघर कमी झाली. परंतु, वेगाने दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्यावेळी तर हे प्रमाण अधिक भयानक आणि अन्य प्रवाशांच्या काळजात धडकी भरविणारे असे असते. उड्डाणपूल उभारण्यापूर्वी या भागातून वाहतूक सुरू होती तेव्हा अगदी चढतीलाही वाहतूक सिग्नल उभारण्यात आले होते.
त्यामुळे रस्ता ओलांडणारे पादचारी, शाळकरी मुले-महिला, छोटी वाहने यांना सोयीचे होते. मात्र, नव्या पुलांनंतर महामार्गावरील सुकूर भागातील वाहतूक सिग्नल बंद झाले. शिवाय वाहने वळविण्याचे ठिकाणीही बदलल्यामुळे ते अधिक धोकादायक ठरत आहे. सुकूर पंचायतकडून चोगम रोडला जाण्यासाठी असलेल्या उताऱ्यावरील सर्कलच्या ठिकाणी वाहनांची गती कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
येथे कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत तसेच रस्ता पार करण्यासाठी अथवा मार्ग बदलण्यासाठी कोणत्या ही खुणा नाहीत. त्यामुळे रस्ता मोकळा दिसत असल्याने बहुतेका वाहनचालक वाहने वेगाने हाकतात. त्यामुळे इतरांना रस्ता ओलांडणे अवघड बनते. त्यामुळे या ठिकाणी पूर्वप्रमाणेच सिग्नल यंत्रणा बसवावी, अशी मागणी होत आहे.
कारण या परिसरात शैक्षणिक संस्था, टपाल कार्यालय, ग्रामपंचायत, निवासी इमारती, औषधालये आणि मंदिर देखील आहे. पुलाखालील रस्ता मोकळा असला तरीही पुलाचे काम अजून बाकी आहे. त्यामुळे अधूनमधून तिथे कामगारांचा वावर असतो. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच अपघात रोखण्यासाठी आणि येथील वाहनांचा गोंगाट कमी करण्यासाठी वाहतूक सिग्नल आणि गतिरोधक घालावेत, अशी मागणी वाहनचालक, प्रवासीही करत आहेत.
रम्बलर्स ठरताहेत बिनकामाचे:
महामार्गावर वाहनांची गती कमी करण्यासाठी बऱ्याचदा गतिरोधकांऐवजी रम्बलर्स घातले जातात. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावेल, अशी अपेक्षा असते. परंतु, रम्बलर्सची संख्या जितकी जास्त तेवढ्या वेगाने वाहन हाकले जाते. नव्या सहापदरी उड्डाणपुलाच्या गिरीकडील भागात रम्बलर्स घालण्यात आले आहे. तिथे पुलावरून येणारे वाहन गती कमी करण्याऐवजी अधिक वेगाने हाकले जाते. त्यामुळे हे रम्बलर्स बिनकामाचे ठरत आहे.