

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यात महिलांविरोधातील वाढत्या भीषण अत्याचारांच्या मालिकेने पुन्हा एकदा समाजमन हादरून गेले आहे. विदेशी पर्यटक महिलांवरील पाशवी अत्याचार आणि खून, बेतालभाटी किनाऱ्यावर घडलेली सामूहिक बलात्काराची घटना, तसेच आता समोर आलेले अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरण या सगळ्या घटनांनी माणुसकीलाच काळिमा फासला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या घटनांनंतरही विकृत मानसिकतेवर कोणताही प्रभावी अंकुश बसलेला दिसत नाही. 'सोहम नाईक प्रकरणा'मुळे तर समाजातील नैतिक अधःपतन आणि सुरक्षाव्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा अधोरेखित झाल्या असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. काकोडा येथील अवघ्या १९ वर्षीय सोहम नाईक या युवकाने १६ हुन अधिक अल्पवयीन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्यानंतर संपूर्ण गोवा हादरला आहे.
वरवर शांत आणि सामान्य वाटणारा हा युवक इतक्या गंभीर गुन्ह्यांत सहभागी असेल, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. मात्र, या प्रकरणाने किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या महिलाविरोधी विकृत मानसिकतेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. लैंगिक विकृतीच्या आहारी गेलेल्या मानसिकतेमुळे कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.
यापूर्वी काणकोण येथील विकट भगत प्रकरणातही अशाच प्रकारे वरून शांत दिसणाऱ्या व्यक्तीचे भीषण रूप समोर आले होते. गेल्या दशकभरात गोव्यात विदेशी महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या आहेत. २००८ मध्ये अंजुणा येथे १५ वर्षीय ब्रिटीश विद्यार्थिनी स्कार्लेट कीलिंग हिचा संशयास्पद मृत्यू आढळून आला होता.
सुरुवातीला अतिमद्यपानामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला; मात्र पुढील तपासात तिच्यावर बलात्कार व ड्रग्सचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली होती.
दीर्घ न्यायप्रक्रियेनंतर आरोपीला शिक्षा झाली, तरीही या घटनेची वेदना आजही कायम आहे. २०१७ मध्ये आयरिश-ब्रिटीश युवती डॅनिएल मॅक्लॉफ्लिन हिच्यावर बलात्कार करून तिचा निघृण खून करण्यात आला. काणकोणच्या देवबाग किनाऱ्याजवळ तिचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता.
या प्रकरणातील आरोपी विकट भगतवर अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दक्षिण गोव्यातील वास्को येथे घडलेली पाच वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व खुनाची घटना अत्यंत संतापजनक होती. आईवर अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर दोन मजुरांनी तिच्या मुलीवर क्रूर अत्याचार करून हत्या केली होती.
या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. तसेच २०१८ मध्ये बेतालभाटीच्या सनसेट किनाऱ्यावर एका गोमंतकीय युवतीवर तिच्या मित्रासमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेमुळे गोव्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. सतत उघड होत असलेल्या अशा घटनांमुळे गोव्यातील कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेषतः सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, अश्लील सामग्रीची सहज उपलब्धता आणि मूल्यशिक्षणाचा अभाव यामुळे तरुण पिढीत विकृत विचारसरणी वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोहम नाईक प्रकरणाने पालकांसमोरही मोठे आव्हान उभे केले आहे. मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवणे, योग्य संस्कार देणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर नियंत्रित ठेवणे, ही काळाची गरज बनली आहे.
फक्त कायदे नको; अंमलबजावणीही महत्त्वाची
महिलांविरोधातील वाढत्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी केवळ कायदे कठोर असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणीही तितकीच महत्त्वाची आहे. पोलिस यंत्रणेची सतर्कता, जलद न्यायप्रक्रिया आणि समाजातील जनजागृती यांचा समन्वय साधल्यासच या विकृत मानसिकतेवर नियंत्रण मिळवता येईल. दक्षिण गोव्यात घडणाऱ्या या घटनांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, महिलांची सुरक्षितता ही केवळ कायद्याची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.