

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यात मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र नियोजित वेळेपेक्षा लवकर वीज बंद केल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांचे मोठे हाल झाले. वीज पुरवठा सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत बंद राहणार होता.
परंतु काही भागांत पहाटे ५ वाजताच वीज खंडित करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना अनपेक्षित अडचणींना सामोरे जावे लागले. पहाटेपासूनच वीज नसल्याने घरगुती कामांवर तसेच व्यावसायिक व्यवहारांवर परिणाम झाला.
नुवे, रावणफोंड, आके, सेंट जुजे आर्यल, आर्लेम आदी भागांत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी वीज सकाळी ७वाजता खंडित झाली, तर काही ठिकाणी ती पहाटे ५ वाजताच बंद करण्यात आली.
नुवे व रावणफोंड परिसरात वीज पुरवठा संध्याकाळी ७वाजल्यानंतरच सुरळीत झाला. संपूर्ण दिवस वीज नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.
याशिवाय काही भागांत पाणीपुरवठाही बंद राहिल्याने रविवारी नागरिकांची कामे खोळंबली. वीज पुरवठा उशिरा सुरळीत झाल्याने घरांपासून ते दुकानांपर्यंत सर्वच ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या