South Goa District Hospital | दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळीमा! पायाला गंभीर जखम असलेला रुग्ण 2 दिवसांपासून जमिनीवरच

South Goa District Hospital | दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील प्रकार; आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह
South Goa District Hospital
South Goa District Hospital
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात समोर आली आहे. गंभीर स्वरूपाची पायाची जखम असलेला एक रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या जमिनीवरच उपचाराविना पडून असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य व्यवस्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

South Goa District Hospital
Colvale Central Jail | कोलवाळ कारागृहात टारझन टोळीची गुंडगिरी सुरूच; खंडणीसाठी नव्या कैद्याला तुरुंगात बेदम मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला गंभीर जखमी अवस्थेत शुक्रवार, २२ मे रोजी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या पायाला मोठी जखम असून त्यातून सतत रक्तस्राव आणि पूस्राव होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्याला योग्य उपचार, ड्रेसिंग किंवा तातडीची वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णाला बेड उपलब्ध करून देण्याऐवजी तो रुग्णालयाच्या जमिनीवरच पडून असल्याचे दिसून आले. उपचाराअभावी त्याच्या जखमेची अवस्था अधिक गंभीर बनली असून, जखमेतून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे इतर रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच कर्मचारी वर्गही त्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. घटनेची माहिती बाहेर आल्यानंतर रुग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. "सरकारी रुग्णालयात गरीब रुग्णांची अशीच उपेक्षा होते का?" आणि "रुग्णालयात माणुसकी उरली आहे का?" असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आले.

काहींनी हा प्रकार वैद्यकीय निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या अपयशाचे गंभीर उदाहरण असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.

South Goa District Hospital
Karwar River Accident| कारवार हादरले! नदीत शिंपले काढण्यासाठी गेलेल्या 7 महिलांसह एकाच कुटुंबातील 10 जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात अपुरी कर्मचारी संख्या, रुग्णांवरील दुर्लक्ष, औषधांचा तुटवडा आणि बेड उपलब्धतेच्या समस्यांबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, एका गंभीर जखमी रुग्णाला अक्षरशः जमिनीवर सोडून दिल्याच्या आरोपामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणामुळे आरोग्य खात्याच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली असून, संबंधित डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तसेच सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news