

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
दक्षिण गोव्यात अमली पदार्थांची तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी पोलिस यंत्रणेसह सर्व संबंधित सरकारी विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याची गरज २५ व्या जिल्हास्तरीय नार्को-समन्वय बैठकीत अधोरेखित करण्यात आली. अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांविरोधात कठोर कारवाई, नियमित तपासणी आणि गुप्त माहितीची देवाणघेवाण अधिक प्रभावी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला. दक्षिण गोव्याच्या उपजिल्हाधिकारी आनारिटा पैस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीचे सहअध्यक्षस्थान सासष्टी व मुरगाव तालुक्यांचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी भूषविले. बैठकीला उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सीमाशुल्क विभाग, अन्न व औषध प्रशासन, समाजकल्याण, शिक्षण आणि आरोग्य विभागांसह विविध सरकारी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गोवा पोलिसांनी आढावा कालावधीत अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत सहा गुन्हे नोंदविण्यात आल्याची, नऊ जणांना अटक केल्याची आणि जनजागृतीचे १९ कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती दिली. आरोग्य विभागाने व्यसनमुक्ती सेवांच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला.
गोवा राज्य एड्स नियंत्रण संस्थेने १२५ कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. अन्न व औषध प्रशासनाने ऑक्टोबर २०२६ मध्ये औषध विक्री केंद्रांची ४० तपासणी केल्याची आणि नियमांचे उल्लंघन आढळलेल्या प्रकरणांत आठ कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती दिली. दरम्यान, अवैध अफू लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वन आणि कृषी विभागाने प्रत्येकी जनजागृतीचे कार्यक्रम राबविल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसन रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, व्यसनमुक्ती उपक्रम आणि जनजागृती मोहिमा अधिक व्यापक करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विविध सरकारी विभागांमधील नियमित समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून दक्षिण गोव्यातील अमली पदार्थांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.