

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
शिवोली मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कार्यरत असलेले एकमेव प्राथमिक केंद्र सध्या शोभेची वास्तू बनून राहिले आहे. वर्षाभरापूर्वी सात कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या विस्तारित इमारतीत साधी एक्स-रे मशीनची सुद्धा सोय नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे केंद्रात येणाऱ्या नियमित रुग्णांबरोबरच छोट्या-मोठ्या अपघातांत सापडलेल्या अनेकांना म्हापशातील जिल्हा रुग्णालयात वारंवार धाव घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
१९७७ पासून कार्यरत असलेल्या येथील आरोग्य केंद्रात केवळ शिवोलीचेच नव्हे, तर पेडणे तालुक्यातील हरमल, केरीपासून ते बार्देशातील हणजूण-वागातोर तसेच म्हापसा-गिरी येथील मजूर रुग्ण येथील केंद्रावर नियमित तपासणीसाठी तसेच ताप, रोगाच्या विविध चाचण्या करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
शिवाय परिसरात कुत्र्यांनी चावा घेतलेले, सर्पदंश झालेले या भागातील अनेक रुग्ण सर्वप्रथम शिवोलीच्या आरोग्य केंद्रावर उपचारासाठी येतात. नियमित रुग्णांची उपस्थिती दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुग्णांपर्यंत जात असते, अशी माहिती रुग्ण नोंदणी विभागाकडून मिळते.
१९७७ पासून कार्यरत असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर २४ तास सेवा देत असल्याचे आढळून येते. त्यामुळे नियमित रुग्ण आणि कॅज्युअल्टीत येणाऱ्या अपघातात सापडलेल्या रुग्णांची तपासणी करताना ड्युटीवरील डॉक्टरांची दमछाक होत असल्याचे केंद्राला भेट दिली असता आढळून येते.
शिवोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅज्युअल्टी विभागाबरोबरच महिलांसाठी प्रसूती विभाग, डोळ्यांची तपासणी करणारा नेत्र विभाग (ऑप्थालमिस्ट), दंत विभाग तसेच पुरुष व महिलांसाठी वेगवेगळे रुग्ण विभाग असून त्या मानाने डॉक्टर्स, परिचारिकांची उणीव दिसून येत आहे.
शिवोली आरोग्यकेंद्रात नियमित सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हजेरीची योग्य वेळ आणि दिवस दाखविणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसविण्यात यावी, अशी स्थानिक लोकांची मागणी आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या शनिवारी येथील एक वयोवृद्ध व्यक्ती जवळच्या चर्चमध्ये प्रार्थना सभेत कोसळला व चर्चपासून अवघ्या २०० मीटरवर असलेल्या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वारंवार फोन करून सुद्धा वेळेवर घटनास्थळी न पोहोचल्याने त्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले अशी खंत चर्चच्या धर्मगुरूंनी व्यक्त केली.
"रक्तचाचणी विभागाबरोबरच इतर विभागांत काम करणाऱ्या येथील (वेळकाढू) कर्मचाऱ्यांना त्यामुळे योग्य चाप बसणार आहे."
– विलियम फर्नांडिस, स्थानिक पंच सदस्य.
शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो तसेच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी येथील समस्यांकडे लक्ष पुरवून आरोग्य केंद्राच्या विस्तारित इमारतीत रुग्णांसाठी आवश्यक सोयी सुविधा तसेच महत्त्वाचे एक्स-रे मशिन आणि अन्य आवश्यक सोयी लवकर पुरविण्याची मागणी शिवोली नागरिक समितीचे अध्यक्ष अमृत आगरवाडेकर तसेच स्थानिक पंच सदस्य विलियम फर्नांडिस यांनी केली आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात शिवोलीच्या आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो यांनी या विषयाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लवकरच या आरोग्य केंद्रात एक्स-रे मशीन उपलब्ध केली जाईल, असे सांगितले.