

वास्को : एखादा प्रकल्प कसा नसावा यासाठी येथील मासळी मार्केट प्रकल्पाकडे बोट दाखवावे लागेल. मासळी मार्केट प्रकल्पामुळे वास्कोवासीयांचे गेले अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले असा सूर या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ऐकण्यास मिळाला होता. तथापी गेल्या चार पाच महिन्यांत या प्रकल्पाची परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या नवीन प्रकल्पापेक्षा पूर्वीचे सिमेंट पत्र्यांचे छप्पर असलेले बैठे मासळी मार्केट अधिक चांगले होते असा सूर सध्या ऐकण्यास मिळत नाही. विक्रेत्यांसाठी योग्य नियोजन करण्यास मुरगाव पालिका राजी नाही. त्यामुळे फळ, नारळ, भाजी विक्रेत्यांनी पहिल्या मजल्यावरील आपली जागा सोडून थेट तळमजल्यावरील पदपथावस्व पूर्वीप्रमाणे आपला व्यवसाय सुरू केला आहे. जुन्या मासळी मार्केटात मासळी विक्रेत्या आतील भागात मासे विक्री करीत होत्या, तर फळे, भाजी, नारळ वगैरे विकणारे विक्रेत्या मार्केटाच्या बाहेरील पदपथावर आपला व्यवसाय करीत होत्या.
दोन मजली नवीन मासळी मार्केट बांधल्यावर भुयारी भागात वाहने पार्किंग करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. तळमजल्यावर मासे विक्रेत्या, पहिल्या मजल्यावर भाजी, फळे, नारळ व इतर वस्तूं विक्रेत्यांची सोय करण्यात आली आहे. तर वरच्या मजल्यावर हॉल आहे. सुंदर अशा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहण्यात येत होते. तथापी प्रत्यक्षात या प्रकल्पातील व्यवसाय सुरू झाल्यावर तेथील समस्या पुढे येऊ लागल्या आहेत.
पहिल्या मजल्यावर आमची सोय करण्यात आली असली, तरी पहिल्या मजल्यावर ग्राहक फिरकत नसल्याने आमचा व्यवसाय होतच नसल्याचा दावा त्या फळ, भाजी विक्रेत्यांनी केला होता. त्यासंबंधी योग्य तोडगा काढण्यात न काढल्याने त्यापैकी काही विक्रेत्यांनी जिन्याच्या पायऱ्यांवरच आपला व्यवसाय सुरू केला होता. तरीही ग्राहक येत नसल्याने त्या विक्रेत्यांनी पालिकेत येऊन आम्ही मार्केटाच्या बाहेरील पदपथाच्या कडेला व्यवसाय करतो, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय पदपथाच्या कडेला सुरू केला. त्यांनी पदपथावर अतिक्रमण करू नये, यासाठी तेथे काही दिवस पालिका कर्मचारी ठेवण्यात आले. मात्र, ते कर्मचारी गायब झाल्यावर हळूहळू त्या विक्रेत्यांनी पदपथावर व्यवसाय सुरू केला आहे.
तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी पूर्वीप्रमाणे मोठ्या छत्र्या उभारल्या आहेत. सायंकाळी-रात्री घरी परतताना या विक्रेत्या आपला माल तेथेच प्लास्टीक कापडाखाली गुंडाळून ठेवतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये त्या सुंदर अशा प्रकल्पाला पूर्वीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.
पार्किंग जागेत सोय करण्याचा प्रस्ताव बारगळला...
पहिल्या मजल्यावर ग्राहक येत नाही, आमचा व्यवसाय होत नाही अशी तक्रार त्या विक्रेत्यांनी केल्यावर त्या विक्रेत्यांची भुयारी मजल्याच्या पार्किंग जागेवर सोय करण्याचा प्रस्ताव मुरगाव पालिकेने मांडला. त्यानंतर त्या पार्किंगच्या जागेत ट्यूब लाईटस् लावण्यात आल्या. काही बदल करण्यात आले. तथापी आम्ही त्या जागेवर व्यवसाय करणार नसल्याचे पवित्रा त्या विक्रेत्यांनी घेतला. त्यानंतर सदर प्रस्ताव बारगळ्यात जमा झाला आहे. आता त्या विक्रेत्यांनी पदपथावरच आपला जम बसविला आहे. आम्ही जुन्या मार्केटात ज्याप्रमाणे पदपथावर व्यवसाय करीत होतो. त्याप्रमाणे आता नवीन मार्केटाच्या पदपथावर व्यवसाय सुरू केल्याने ग्राहके खरेदीसाठी येतात असे विक्रेत्या सांगतात.