

प्रभाकर धुरी
पणजी : अलीकडच्या काळात वृद्ध पालकांबद्दल वाढणारी असंवेदनशीलता काळीज कुरतडणारी आहे. प्रत्येकाने हे समजून घ्यायला हवे की, आदराशिवाय कौटुंबिक नात्याला अर्थच नसतो, असे विधान बँडिट क्वीनमध्ये फुलनदेवीची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी येथे केले.
त्या खोया पाया या संवेदनशील विषयावरील चित्रपटाच्या इफ्फीतील प्रदर्शनासाठी आल्या होत्या. खोया पाया या चित्रपटात त्यांची वृद्ध आईची भूमिका आहे. यावेळी त्यांनी वृद्ध पालकांवरील गैरवागणूक या विषयावर उत्कटतेने भाष्य केले. या समस्येला खूप व्यापक संबोधून त्या म्हणाल्या, मी अशी अनेक कुटुंबे पाहिली आहेत, जिथे वृद्ध पालकांना वाईट वागणूक दिली जाते, असे ते म्हणाले. चित्रपट हे एक शक्तिशाली माध्यम आहे, जे समाजावर प्रभाव टाकू शकते. वृद्ध पालकांबद्दल वाढत्या असंवेदनशीलतेबद्दल आता बोलणे महत्त्वाचे आहे.
सीमा बिस्वास म्हणाल्या, वृद्ध पालकांना उद्ध्वस्त करणारी मुले भारतासारख्या समाजात घडू नयेत. भारतात पारंपरिकपणे तीन पिढ्या एकत्र राहतात. मात्र,अलीकडे काही मुलांना पालकांबद्दल प्रेम, आदर उरलेला नाही. त्यांना कुंभमेळ्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी एकटे सोडून दिले जाते, नाहीतर वृद्धाश्रमात धाडले जाते. याच विषयावरील पटकथा मला जेव्हा दिग्दर्शक व पटकथालेखक आशुतोष सिंग यांनी दिली, तेव्हा मी सुन्न झाले. मला ती वाचल्यावर काहीच बोलता येत नव्हते. मी त्याला म्हटले मी सावरल्यावर बोलते, असे त्या म्हणाल्या. चित्रपटातील त्या सोडून दिलेल्या आईच्या जागी मी असते, तर मी परत आलेच नसते. अशावेळी स्वाभिमान आवश्यक आहे; आदराशिवाय कौटुंबिक बंधांचा अर्थ हरवतो, असेही बिस्वास यावेळी म्हणाल्या. सीमा बिस्वास म्हणाल्या, माझ्या आजूबाजूला जेव्हा अंथरुणात शी- सू केलेल्या वृद्ध आई-वडिलांना मुले बोलतात, त्यांचा तिरस्कार करतात, तेव्हा मी हस्तक्षेप करते. तुम्ही अशी शी-सू कितीतरी वेळा केली आणि आई वडिलांनी ती साफ केली. त्याची जाणीव ठेवा, असे सांगते.