पणजी : गोव्याच्या २०२४-२५ या वर्षाच्या सागरी पर्यटन हंगामाला बुधवार, दि. १८ सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. एमव्ही एम्प्रेस हे देशांतर्गत पर्यटक जहाज मुरगाव बंदरात मुंबईमार्गे येणार आहे. बुधवारी येणाऱ्या या १८०० पर्यटक जहाजावरील ६०० कर्मचारी मिळून २४०० व्यक्ती असतील.
जे. एम. बक्षी कंपनीचे सरव्यवस्थापक गोविंद पेनुर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ५ डिसेंबर रोजी सेलेब्रिटी मिलेनियम हे या हंगामातील पहिले विदेशी पर्यटक जहाज मुंबईमार्गे २०३४ पर्यटक व ८५० जहाजावरील कर्मचारी मिळून २८८४ जणांना घेऊन येणार आहे. यंदा एकूण दहा विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार असून १२,०१७ पर्यटक तर ५२९२ या जहाजातील कर्मचारी वर्ग मिळून १७३०९ देशी-विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात गोव्याचा सौंदर्यसृष्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल होणार आहेत.
मिलेनियम या जहाजाची दुसरी फेरी रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईमार्गे मुरगाव बंदरात होणार असून २८८४ पर्यटक दाखल होणार आहेत. गुरुवार दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई मार्गे मुरगाव बंदरात सेव्हन सीस व्होएजर हे विदेशी पर्यटक जहाज ७०० पर्यटक व ४२० कर्मचारी मिळून ११२० पर्यटकांना घेऊन दाखल होणार आहे.
या जहाजाच्या आगमनाने २०२४-२५ या सागरी पर्यटन हंगामाची पहिल्या टप्प्याची सांगता होणार आहे. २०२४-२५ या पर्यटन हंगामात एमव्ही या देशांतर्गत जहाजाच्या एकूण ३० फेन्या १४ जून २०२५ पर्यंत असतील. यातून ६१,०२० पर्यटक तर या जहाजावरील १८ हजार कर्मचारी मिळून ७९,०२० देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.
२०२४-२५ या सागरी पर्यटन हंगामातील शेवटचे विदेशी पर्यटक जहाज 'सिल्व्हर व्हीस्पर' सोमबार दि. १२ मे २०२५ रोजी कोचीनमार्गे ४३५ पर्यटक व ३०५ जहाजावरील कर्मचारी मिळून ७१४० देशी विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल होणार आहे.
या पर्यटन हंगामाची दुसऱ्या टप्प्याची सुरुवात एमव्ही एम्प्रेस या देशांतर्गत जहाजाद्वारे गुरुवार दि. १ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पहिले विदेशी पर्यटक जहाज गुरुवार दि. २० फेब्रुवारी रोजी 'मेलेबिटी मिलेनियम' या जहाजाद्वारे होणार आहे. या पर्यटक जहाजातून पर्यटक व कर्मचारी मिळून २८४ देशी विदेशी पर्यटक मुरगाव बंदरात दाखल होणार आहे. सदर जहाज मुंबईमार्गे गोव्यात दाखल होणार आहे. नंतर ते पर्यटकांना घेऊन कोलंबो येथे रवाना होणार आहे.
• दुसरी फेरी ८ डिसेंबर रोजी येणार
• देशांतर्गत जहाजाच्या एकूण ३० फेऱ्यांचा समावेश