गोवा : केपेत उभारणार समुद्र संग्रहालय

गोवा : केपेत उभारणार समुद्र संग्रहालय
Published on
Updated on

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : समुद्र संग्रहालय हा पर्यटन खात्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प केपे येथील किटला गावात उभारण्याचा विचार पुढे आलेला असून, या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. पर्यटन व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प भविष्यकाळात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

समुद्र संग्रहालय उभारण्याचे सूतोवाच पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. १० वर्षांपूर्वी समुद्र संग्रहालय मिरामार येथे उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. मात्र, त्याला मूर्त स्वरूप आले नाही. समुद्राचे स्त्रोत चांगल्या पद्धतीने विकसित करणे आणि उपयोगात आणणे हा या प्रकल्पामागचा उद्देश असणार आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे आणि समुद्र किनारे यांच्याशिवाय राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवीन आणि चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.

'नील अर्थव्यवस्था' संकल्पनेला पुढे नेण्यासाठीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल ठरण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी घेण्यात येणार आहे. हा देश पातळीवरही महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात राज्य सरकार पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान देण्याविषयीचा विचारही या प्रकल्पाद्वारे मांडण्याचा सरकारचा हेतू आहे. या प्रकल्पासाठी बोली लावण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्यावतीने खासगी कंपन्यांकडून विस्तृत प्रकल्प अहवाल मागविण्यात आलेले आहेत.

पर्यटनविषयक नवीन संधी

या प्रकल्पातून पर्यटनविषयक नवीन संधी निर्माण होणार असल्याचे मंत्री खंवटे यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यात यामुळे पायाभूत विकासालाही नवीन चालना मिळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण गोव्यातील युवकांना या प्रकल्पामुळे नवीन संधी मिळणार असून रोजगारनिर्मिती होण्याची शक्यताही मंत्री खंवटे यांनी व्यक्त केली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news