

सत्तरी : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर बाबींवर जाहीर सभेत भाष्य केल्याचा राग धरुन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी समीर गोवेकर या सामान्य कार्यकर्त्याला लक्ष्य केले आहे. समीर यांनी व्यवसायासाठी भाड्याने जमीन दिलेल्या हॉटेलवर एफडीएमार्फत छापेमारी करुन सदर हॉटेल सील करण्यात आले आहे.
एकीकडे जनतेचे भले करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगणारे हे मंत्रीच लोकांना त्रास देण्याचे काम करतात, असे वक्तव्य आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी केले. ही कारवाई झाल्यावर आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, उपाध्यक्ष सुनील सिंगणापूरकर आणि सत्तरीतील स्थानिक आपचे नेते अर्जुन गुरव यांनी रविवारी समीर गोवेकर यांची भेट घेतली.
त्यानंतर नाईक बोलत होते. नाईक वाल्मकी नाईक म्हणाले, म्हापसा येथे निवृत्त न्यायमूर्ती फर्दिन रेबेलो यांच्या इनफ इज इनफ या लोकचळवळीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहीर सभेत समीर गोवेकर यांनी सत्तरी तालुक्यातील बेकायदेशीर प्रकारांबाबत जाहीर भाष्य केले होते.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी समीर यांनी जागा भाड्याने दिलेल्या हॉटेलवर धाड टाकून हॉटेल सील केले. याचा अर्थ या कारवाईची वेळ सर्वकाही उघड करते. मंत्री विश्वजीत राणे हे एफडीएला स्वतः च्या वैयक्तिक अधिकारात वापरुन आपल्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नागरिकांना त्रास देत असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. मंत्र्यांविरोधात बोलणे हा गुन्हा नाही, असेही ते म्हणाले
... म्हणूनच केली कारवाई
वर्षानुवर्षे राणेंसमोर न झुकलेले समीर सध्या कोणत्याही पक्षाचे काम करत नाहीत. त्यांनी आपले नेतृत्व मान्य करावे अशी अपेक्षा मंत्री राणे यांना आहे. पण लढाऊ कार्यकर्ता असलेल्या समीर यांनी ते अमान्य केले. त्यामुळे त्यांनी अंतर्गत गोष्टी उघड केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे समीर यांनी सांगितले.