

पणजी : प्रभाकर धुरी
रोजच्या जगण्यात घडणाऱ्या साध्या प्रसंगांतूनही अलौकिक आणि भावनिक अनुभवांचा प्रवास उलगडू शकतो, हे 'सर्वम् माया' या मल्याळम चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. इफ्फी २०२६ च्या इंडियन पॅनोरमा विभागात या चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे. रोजच्या भेटीगाठी आणि वैयक्तिक अनुभवांतून चित्रपटाची कल्पना कशी सुचली, याविषयी दिग्दर्शक अखिल सत्यन यांनी माहिती दिली.
अखिल सत्यन म्हणाले की, स्वतःला आणि मित्र निविन पॉली यांना भयापटांची भीती वाटत असल्याने सुरुवातीला असा चित्रपट बनवण्याबाबत दोघेही साशंक होते. मात्र, एका मंदिरात पूर्वी नास्तिक असलेल्या पुजाऱ्याची भेट झाली आणि त्यातून चित्रपटाच्या कल्पनेला आकार मिळाला. भूत काढणारा नास्तिक पुजारी आणि त्याच्या सोबतीला असलेले जनरेशन झेड भूत अशी अनोखी कथा त्यातून साकारली.
अखिल सत्यन लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात प्रभेंदू या संगीतकाराची कथा आहे. कुटुंबाच्या परिस्थितीमुळे नास्तिक असलेल्या प्रभेंदूला पारंपरिक हिंदू पुजारी बनावे लागते. त्याच्या आयुष्यात माया ऊर्फ 'डेलुलू' या तरुण महिलेच्या आत्म्याचे आगमन होते. स्वतःच्या भूतकाळाशी जुळवून घेण्यासाठी धडपडणाऱ्या मायासोबत त्याची मैत्री होते. या नात्यातून आत्मशोध, श्रद्धा, प्रेम आणि मानवी संबंधांतील भावनिक बंध उलगडतात.
प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी अनावश्यक हिंसा किंवा अॅक्शन दृश्यांची गरज नसते. विनोदही नाट्य आणि थराराइतकाच व्यावसायिक यशासाठी प्रभावी ठरू शकतो. तो कथेला भावनिक खोली आणि सौंदर्य देतो, असे अखिल यांनी सांगितले. निविन पॉली यांची नैसर्गिक विनोदबुद्धी असल्याने त्यांच्यासोबत काम करणे आनंददायी ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या चित्रपटांतील स्थानिक घटक स्वतःच्या अनुभवातून नैसर्गिकपणे आले आहेत. सुरुवातीला मणिरत्नम यांच्या, विशेषतः 'बॉम्बे' चित्रपटाचे आकर्षण होते. नंतर वडिलांच्या 'वरवेलपू'सह इतर चित्रपटांतील संवादांची खोली जाणवू लागली.
ज्येष्ठ अभिनेते आणि पटकथालेखक श्रीनिवासन यांचाही प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. इफ्फीची 'स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स' ही संकल्पना स्थानिक अनुभवातून सार्वत्रिक मानवी भावना व्यक्त करणाऱ्या या चित्रपटाशी जोडली जाते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून चित्रपटसृष्टीत आलेल्या अखिल सत्यन यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांना दोन मिनिटांच्या चित्रपटासाठी प्रभावी कल्पना लिहिण्यापासून सुरुवात करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याचे चित्रीकरण आणि संपादन करावे. चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल पेन्सिल आणि कागद पुरेसा आहे. चांगल्या प्रकारे कल्पना आयुष्याची दिशा बदलू शकते, असे ते म्हणाले.