

साखळी : पुढारी वृत्तसेवा
साखळी येथील मे. दामोदर मंगलजी अँड कं. एच. पी. गॅस एजन्सीच्या गोदामात ऑनलाईन पेमेंटची सुविधा, विशेषतः गुगल पे बंद करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या काळात घरगुती गॅस सिलिंडर घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना केवळ रोक रक्कम स्वीकारली जात असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.
आजच्या डिजिटल युगात बहुतांश व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत असताना एच. पी. गॅस एजन्सीच्या गोदामात केवळ रोख रक्कम स्वीकारण्याची पद्धत ग्राहकांच्या दृष्टीने कालबाह्य ठरत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेषतः अचानक सिलिंडर घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडे रोख रक्कम उपलब्ध नसल्यास त्यांना ऑनलाईन पेमेंट करता येत नसल्याने सिलिंडर न घेता परत जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहारांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणावर रूढ झाला असताना, गॅससारख्या अत्यावश्यक सेवेसाठी ग्राहकांना केवळ रोख रक्कम आणण्याची अट घालणे हा डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या प्रवाहाशी विसंगत प्रकार असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
गणेश चतुर्थीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात गॅस सिलिंडरची मागणी वाढलेली असताना ग्राहकांना पेमेंटच्या अशा जुनाट पद्धतीमुळे मनःस्ताप सहन करावा लागत आहे. एजन्सीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात नेमकी अडचण काय आहे, असा सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
संबंधित गॅस कंपनी, तसेच पुरवठा यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन गोदामात यूपीआय/गुगल पे यांसह डिजिटल पेमेंटची सुविधा पूर्ववत करावी आणि ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून होत आहे. अत्यावश्यक सेवेशी संबंधित व्यवहारात ग्राहकांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणेने घेणे गरजेचे असल्याचेही ग्राहक वर्गाचे मत आहे.