

पणजी : राज्यात लवकरच जल मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असून, राज्यातील सागरी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार २,००० कोटी रुपयांचे विविध प्रकल्प राबविणार असल्याची घोषणा केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शुक्रवारी केली. पणजीतील मांडवी नदीकिनारी उभारण्यात आलेल्या कॅप्टन ऑफ पोर्टस् विभागाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, बंदर कप्तान मंत्री दिगंबर कामत, नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा सदस्य सदानंद तानावडे, अनिवासी भारतीय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर, आमदार संकल्प आमोणकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री सोनोवाल म्हणाले, गोव्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी वॉटर मेट्रोला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. लोकांना आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येईल. यासोबतच सागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे २,००० कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्याने उभारण्यात आलेल्या कॅप्टन ऑफ पोर्टस् इमारतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, जहाजाच्या आकारावर आधारित ही वास्तू गोव्याच्या समृद्ध सागरी इतिहासाचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. सरकारने या माध्यमातून गोव्याचा सागरी वारसा जतन आणि संवर्धन करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वजांनी निर्माण केलेल्या वारशाचे जतन करून तो भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज पंतप्रधान सातत्याने अधोरेखित करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले की, राज्यात उभारण्यात येणारा तरंगता जेटी प्रकल्प कोळसा वाहतुकीसाठी नसून जलवाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आहे. तसेच गोवा मेरीटाईम बोर्ड ३० सप्टेंबरपूर्वी अस्तित्वात येईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, खलाशी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे ज्येष्ठ खलाशांसाठीच्या 'ओल्ड एज बेनिफिट स्कीम'मध्ये सुधारणा करण्याची तसेच भारतीय क्रूझ जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा होणारी १५ अमेरिकन डॉलरची कपात बंद करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष जोझेफ फर्नांडिस, सचिव मायकल बेनी डिसोझा आणि माजी अध्यक्ष डिक्सन वाझ यांचा समावेश होता.
मुरगाव पर्यटन टर्मिनल सहा महिन्यांत पूर्णत्वास
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, मुरगाव बंदरात उभारण्यात येणारे स्वतंत्र पर्यटन टर्मिनल पुढील सहा महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे क्रूझ पर्यटन आणि जलवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. कॅप्टन ऑफ पोर्टस्ची नवीन इमारत केवळ गोव्यातच नव्हे, तर देशभरात तिच्या जहाजप्रेरित अनोख्या वास्तुरचनेमुळे वेगळी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पोर्तुगीज काळ, मुघलकालीन नौदल व्यवस्था तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमार परंपरेचा उल्लेख करत गोवा ऐतिहासिकदृष्ट्या जगासाठी महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार राहिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.