

पणजी : पुढारी वृत्तसेवा
दिल्लीतील रोहिणी न्यायालयाने नाईट क्लबचे मालक सौरभ आणि गौरव लुथरा यांचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. तसेच त्यांच्या विरोधातील लुक आऊट सर्क्युलर (एलओसी) रद्द करण्यासही नकार दिला.
या प्रकरणात २५ जणांचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि भीषण असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने गुन्ह्याची गंभीरता, त्यांचे बेजबाबदार वर्तन व कागदपत्रांतील त्रुटीमुळे अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
रोहिणी न्यायालयाच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश वंदना यांनी दिलेल्या ९ पानी आदेशात म्हटले आहे की, अर्जदारांनी मांडलेले दावे परस्परविरोधी असून त्यांच्या वर्तनावरून त्यांना कोणताही तातडीचा दिलासा देणे योग्य नाही. अर्जदाराने जीवनाला धोका असल्याचा दावा आधारहीन असल्याचे नमूद करून न्यायालयाने फेटाळला.
अर्जदाराने असा धोका असल्याचे कोणतेही विश्वसनीय कारण दाखविलेले नाही. तपास यंत्रणेची कारवाई किंवा न्यायालयाची पावले ही कायद्याप्रमाणे होत असल्याने ते जीवनाला धोका ठरू शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. लुथरा बंधूंपैकी एकाला सीझर डिसऑर्डर आणि हायपरटेन्शन असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या वकिलांनीच हे कारण ग्राह्य नसल्याचे सांगितले. न्यायालयाने निरीक्षण केले की सादर केलेली वैद्यकीय कागदपत्रे जुनी असून गंभीर स्थिती दाखवत नाहीत, असे नमूद करून आरोग्याचा मुद्दा फेटाळला. न्यायालयाने नमूद केले की, लुथरा बंधू सध्या फुकेट (थायलंड) येथे असल्याचे मान्य केले आहे.
प्रकरण गोव्यात घडले असताना तिथल्या सक्षम न्यायालयाकडे का गेले नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले नाही. अर्ज फेटाळताना न्यायालयाने स्पष्ट केले की अर्जदारांना सक्षम क्षेत्राधिकार असलेल्या न्यायालयात कायद्याप्रमाणे योग्य दिलासा मागण्याची मुभा आहे ते हे न्यायालय देऊ शकत नाही.
भारतातून निघण्याचे दिले खोटे कारण...
लुथरा बंधूंनी भारतातून निघण्याबाबत खोटे कारण दिले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटेलाच ते निघून गेले. नाईट क्लब चालवण्यासाठी आवश्यक असलेला अग्निशमन दलाकडून सुरक्षा परवाना घेतला नव्हता. गोव्यातच असताना त्यांनी तेथील न्यायालयात अर्ज न करण्याचे कोणतेही कारण दिले नाही, असा दावा गोवा पोलिसांनी न्यायालयात केला.