

वाळपई : पुढारी वृत्तसेवा
सत्तरी तालुक्यातील नद्या, धबधबे तसेच पावसाळ्यात पाण्याने भरून जाणाऱ्या बेकायदेशीर चिरेखार्णीमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून ही बाब गंभीर चिंता निर्माण करणारी ठरत आहे. स्थानिक पंचायर्तीकडून विविध ठिकाणी सूचना फलक लावून जनजागृती केली जात असली, तरी प्रत्यक्षात दुर्घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. परिणामी, दरवर्षी निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून संबंधित गावांच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे.
स्थानिकांच्या मते, नदीकाठी आणि धबधब्यांवर सहलीसाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांकडून मद्यपान केले जाते. मद्यधुंद अवस्थेत खोल डोह किंवा धोकादायक भागात उतरल्यामुळे पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज येत नाही आणि अपघात घडतात. त्यामुळे सरकारने यापुढे कठोर उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे. याशिवाय, पावसाळ्यात बेकायदेशीर चिरेखाणींमध्ये साचलेले पाणीही मृत्यूचे सापळे ठरत आहे.
खोल खंदकांमध्ये पाणी भरल्याने जनावरे तसेच नागरिक बुडण्याचा धोका कायम असून प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या दहा वर्षांतील नदीत बुडून झालेल्या अनेक मृत्यूंमध्ये मद्यपान हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे. विशेषतः उन्हाळ्यात नदीकाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मद्यपान करून धिंगाणा घालणे, मोठ्या आवाजात संगीत वाजविणे आणि त्यानंतर नदीत उतरणे, हा प्रकार वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मद्यधुंद अवस्थेत नदीत उतरणाऱ्यांना रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविणे, अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे तसेच आवश्यक ठिकाणी प्रवेशबंदी लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलीस, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि संबंधित पंचायती यांनी संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी कृती आराखडा तयार करण्याची वेळ आल्याचे स्थानिकांचे मत आहे. राज्यात नदीत बुडून होणाऱ्या घटनांची दखल घेत अनेक पंचायतींनी नदीकिनारी धोक्याचे सूचना फलक उभारले आहेत.
सत्तरीतील नगरगाव, सावर्डे, भिरौंडा, खोतोडा आणि गुळेली पंचायतींनी धोकादायक नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करणारे फलक लावले आहेत. काही ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र, अनेक पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करून नदीत उतरतात. त्यामुळे केवळ सूचना फलक लावून उपयोग नसून प्रत्यक्ष अंमलबजावणी, पोलीस गस्त आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सावर्डे पंचायत क्षेत्रातील म्होवाचो गुणो तसेच भिरौंडा पंचायत परिसरातील नदीकिनारे उन्हाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरतात.
या भागात यापूर्वी अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. ग्रामसभांमधून शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे ठराव वारंवार करण्यात आले आहेत. मात्र, कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणा सुरूच असून अपघातांची शक्यता वाढत आहे. सध्या पावसाळा सुरू झाल्याने सत्तरीतील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. महादई अभयारण्य परिसरातील धबधबे पर्यटकांचे आकर्षण असले तरी ते अत्यंत धोकादायक आहेत.
काही धबधब्यांवर वन खात्याने अधिकृत परवानगी देऊन गोवा वनविकास महामंडळामार्फत मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था, जीवनरक्षक साधने किंवा नियंत्रण यंत्रणा उपलब्ध नाही. पावसाळ्यात पाण्याचा वेग अचानक वाढणे, खोल डोह तयार होणे आणि दगड निसरडे होणे यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो. सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी पूर्वी झालेल्या बेकायदेशीर चिरेउत्खननामुळे मोठमोठे खंदक निर्माण झाले आहेत.
पावसाळ्यात हे खंदक पाण्याने भरल्याने ते धोकादायक बनतात. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने जनावरे तसेच नागरिक त्यात पडून अपघात होण्याची शक्यता कायम आहे. प्रशासनाने या सर्व धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करून सुरक्षा व्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जनजागृती नको, प्रभावी अंमलबजावणी व्हावी
तज्ज्ञांच्या मते, केवळ जनजागृती करून उपयोग होणार नाही. धोकादायक पर्यटनस्थळांवर सीसीटीव्ही, स्वयंसेवक, जीवनरक्षक पथके, बचाव उपकरणे, आपत्कालीन संपर्क व्यवस्था, मद्यधुंद व्यक्तींना प्रवेशबंदी आणि नियमित पोलीस गस्त यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अशा दुर्घटनांमध्ये मोठी घट होऊ शकते. मिरौंडा पंचायतीचे सरपंच उदयसिंग राणे यांनी सांगितले की, नदीत बुडून होणाऱ्या घटनांबाबत अनेक वेळा स्थानिक पोलीस यंत्रणेला पत्रे पाठविण्यात आली आहेत. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी धोकादायक ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त केल्यास अशा घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळू शकते.
सहलीसाठी येणारे अनेक तरुण मद्यपान करून नदीत उतरतात आणि दुर्दैवी घटनांना आमंत्रण देतात. त्यामुळे संबंधित गावांची बदनामी होते आणि स्थानिक नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. सरकारने संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त, प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्यास अपघात रोखण्याबरोबरच सुरक्षित पर्यटनालाही चालना मिळेल.
उदयसिंग राणे, सरपंच, मिरोंडा पंचायत