Food Prices Rise | तांदूळ, मसाला, खाद्यतेल, साखर महागली

श्रावणात दराचा भडका; गणेश चतुर्थीच्या तोंडावर सामान्यांना महागाईचा तडाखा
food-oil-prices increased
खाद्यतेल किंमतीfile photo
Published on
Updated on

पणजी : ऐन श्रावणात आणि गणेश चतुर्थीच्या तोंडावर तांदूळ, खाद्यतेल आणि साखरेच्या दरात मोठी मोठी वाढ झाली आहे. यामुळे यंदाच्या चतुर्थीमध्ये सामान्यांच्या खिशाला कात्री लागून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.

पणजीत साखरेचा दर आज, शनिवारी ७० रुपये होता. तो ७५ पर्यंत जाण्याची शक्यता दुकानदारांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत साखर ४५ रुपयांवरून ७० रुपये किलोवर पोचली आहे. तांदळाच्या दरात प्रतिकिलो मागे १० ते २० रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलाचे दर २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. वाटी खोबरे, लाल मिरची आणि मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. आवक कमी असणे, वाढलेल्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा पुरेसा नसणे व अन्य कारणांमुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सणासुदीच्या दिवसांत साखर, तेल व अन्य किराणा मालाची मागणी वाढते. मात्र त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने दरवाढ होते. तथापि, यावेळी दराने उसळी घेतली असून सध्याची दरवाढ पुढील तीन महिने कायम राहण्याची शक्यता आहे.

मागील काही महिन्यांपासून इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन दरवाढ झाली आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून अन्य वस्तूदेखील खर्चिक झाल्या आहेत, पणजी बाजारात सोनामसुरी तांदळाचे दर ५५ रुपयांवरून ७० रुपये किलो झाले आहेत. जीरा तांदूळ ७० रुपयांवरून ८० रुपये किलो झाला आहे. ऐश्वर्या तांदूळ ७५ वरून ८० रुपये, किशोर तांदूळ ४७ वरून ६६ रुपये झाला आहे. याशिवाय सोयाबीन तेलाची किंमत दर्जानुसार १८० ते २२० रुपये लिटर झाली आहे.

खोबरे, कांदा, मसाला महागला

नारळाच्या सुक्या वाटीची (खोबरे) किंमतही वाढली आहे. ४०० रुपये किलोने मिळणारे खोबरे ५५० रुपयांना विकले जात आहे. लाल मिरची आणि मसाल्याच्या दरातही वाढ झाली आहे. १०० ग्रॅम लाल मसाला पाकीट ५० वरून ६४ वर पोचले आहे. किलोमागे १४० रुपयांची वाढ झाली आहे. काश्मिरी मिरची ७०० वरून १,००० रुपये झाली आहे. तब्बल ३०० रूपये किलोमागे वाढले आहेत. अशीच दरवाढ इतर मिरची मसाल्यात झाली आहे. शिवाय कांदा ४० रुपयांवरून तब्बल ६० रुपये प्रतिकिलो झाला आहे. सगळ्या जीवनावश्यक व दररोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

हरमल भागात भाजी महागली

हरमल : गणेश चतुर्थी सण अवघ्या दिवसांवर ठेपला असल्याने कडधान्य व भाजीपाला महाग होत असल्याचे एका नागरिकाने बोलताना सांगितले. हरमल भागात शुक्रवारी ५० रुपयांना ६ भेंडे, दोन दोडकी, चार काकडी असे दर होते. साखर ७५ रुपये किलो तर कांदे व बटाटे ५० रुपये किलो दराने खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर आली होती. चतुर्थी काळात आणखीन महाग होईल, या भावनेने काहीनी कांदे, बटाटे यांची पोती घेऊन साठवणूक केली. दरम्यान, २०० रुपयांना ५ बांगडे, ५०० रुपयांना २५ कोळंबी, मासळी मिळू लागल्याने खवय्यांनी काही अंशी पाठ फिरवली तर काहींनी श्रावण महिना असल्याने खाणार नसल्याची प्रतिक्रिया दिली.

बाजारात दर उसळल्याने ग्राहकांनी सरकारच्या धोरणावर कडक टीका केली. सण, उत्सवाच्या काळात दरवर्षी सरकारचे नियंत्रण नसते, त्याचा परिणाम ग्राहकांना भोगावा लागतो. आगामी काळात निवडणूक असल्याने सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे काहींनी व्यक्त केले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news