

पणजी : नगर नियोजन कायद्यातील ३९अ कायद्यामुळे राज्यातील डोंगर, वनसंपदा नष्ट होत आहेत. जमिनीवर मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्यामुळे गोवेकरांच्या अस्तित्वावर संकट आले आहे. पुढील पिढीसाठी राज्यातील डोंगर जमीन सुरक्षित राहायला हव्यात आणि त्यासाठी ३९अ रद्द व्हायलाच हवा, अशी जोरदार मागणी शुक्रवारी राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.
'इनफ इज इनफ'च्या बॅनरखाली शुक्रवारी राज्यभरातील सुमारे ५०० च्या आसपास लोकांनी पाटो-पणजी येथील नगर नियोजन खात्याच्या बाहेर जमा होऊन जोरदार आंदोलन केले. ३९ अ रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनावेळी उपस्थितांनी आंदोलनात काँग्रेस आमदार सहभागी न झाल्याबद्दल काँग्रेस नेत्यांना टार्गेट केले.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार कुंभकर्ण बनून झोपले असून, या सरकारला आता जागे करण्याची नव्हे, तर त्यांना घरी पाठवण्याची गरज आहे. या सरकारचे शेवटचे सहा महिने शिल्लक असल्याची टीका त्यांनी केली.
प्रादेशिक आराखडा ही खासगी मालमत्ता नाही, ती लोकांची मालमत्ता आहे. ३९ अ रद्द व्हायलाच हवे, असे ठाम प्रतिपादन क्लॉड अल्वारिस यांनी केले. राजदीप नाईक यांनी गोवेकरांना सरकार कुत्रे समजत असल्यास हे कुत्रे आता सरकारला चावतील, अशी टिप्पणी केली. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांनी सर्व राजकीय पक्षांनी '३९ अ' च्या विरोधात एकत्र यावे; अन्यथा सामाजिक कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षांच्या दारी जाऊन त्यांना एकत्र येण्यास भाग पाडलीत.
अशा आंदोलनाला कमी लोक येतात ही संख्या वाढण्याची गरज असल्याचे सांगितले. शंकर पोळजी यांनी राज्यातील डोंगर कापले, झाडे कापली म्हणून पाऊस कमी झाल्याचा दावा करून धरणे कोरडी पडण्यास सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला.
आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी '३९ अं'च्या विरोधात सर्व गोवेकरांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगून तसे न झाल्यास गोवा पुढील पिढीसाठी बाकी राहणार नाही. '३९ अ'च्या विरोधात लोकांनी आवाज बुलंद करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार कार्ल्स फेरेरा यांनी आपण लोकांसोबत असल्याचे सांगून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याची गरज व्यक्त केली. यावेळी देविदास आमोणकर, गोविंद शिरोडकर, काँग्रेसचे अमरनाथ पणजीकर, माजी मंत्री एलिनान साल्ढाणा, माजी पोलिस अधीक्षक न बॉस्को जॉर्ज आदींनी जोरदार भाषणे ना केली आणि '३९ अ' रद्द करण्याची जोरदार मागणी केली. 'इनफ इज एनफ' अ च्या एका शिष्टमंडळाने नगर नियोजन खात्याला शेवटी निवेदन दिले.
काँग्रेसच्या आमदारांवर टीका
३९ अ विरोधातील आजच्या आंदोलनावेळी काही नागरिकांनी सरकार सोबतच काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केले. एका नागरिकाने काँग्रेसचे आमदार कारापूरच्या आंदोलकांसोबत का दिसत नाहीत. तुम्ही प्रत्यक्ष कृती न करता आंदोलनाचे श्रेय घेऊ पाहता, आम्ही तुमचे का एकावे, असे अनेक प्रश्न गिरीश चोडणकर यांना केले. हळदोणेच्या एका युवकांने आमदार फेरेरा यांना तुम्ही मोठ्या प्रकल्पांना संरक्षण देता बाऊंसर ठेवून लोकांना विरोध करण्यापासून रोखता, स्पष्टीकरण द्या, अशी मागणी केली. लोक काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट करत असल्याचे पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.
भाजपने टीसीपीला बनवले 'एटीएम मंत्रालय'
'आप'चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 'आप'च्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सत्ताधारी भाजपने टीसीपी विभागाला स्वतःचे 'एटीएम मंत्रालय' बनवले असल्याचा आरोप करत वाल्मिकी नाईक यांनी गोवेकरांना कलम '३९ अ' विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आणि हे कलम रद्द करण्यासाठी विशेष विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मागणी केली.