

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ लिमीटेडमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून सातत्याने सेवा बजावणाऱ्या २२० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने नियमित करावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी महामंडळ व्यवस्थापनाला दिला.
पाटकर यांनी इंटक गोवा प्रदेशाध्यक्ष अजय प्रभूगावकर तसेच महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसोबत गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना घेराव घालत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कर्मचाऱ्यांच्या नियमितीकरणासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
२० वर्षे ही तात्पुरती सेवा असू शकत नाही. आयुषभराची सेवा केवळ कंत्राटी सोयीच्या नावाखाली दुर्लक्षित करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीतून सन्मान, सुरक्षा आणि हक्क मिळवले आहेत. सरकारने दुर्लक्ष सुरूच ठेवले तर हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही पाटकर यांनी दिला.
महामंडळातील हे कर्मचारी केवळ तात्पुरत्या स्वरूपाचे कामगार नसून, गेल्या दोन दशकांपासून महामंडळाची कायमस्वरूपी आणि अत्यावश्यक कामे बजावत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील १५ ते २० वर्षे सेवेमध्ये घालवली असून, तरीही त्यांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि त्यासोबत मिळणारे लाभ मिळत नसल्याचे पाटकर यांनी म्हटले.
या कर्मचाऱ्यांमध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांसह लिपिकीय, प्रशासकीय आणि विपणन विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कामाच्या स्वरूपानुसार अनेक कर्मचाऱ्यांना लागू वेतनश्रेणीही निश्चित करण्यात आल्याचे पाटकर यांनी सांगितले.
सरकारकडून नवीन रोजगाराच्या संधी जाहीर केल्या जात असताना गेल्या दोन दशकांपासून राज्याची सेवा करणाऱ्या २२० कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा सवालही पाटकर यांनी उपस्थित केला.
नवीन हजारो नोकऱ्यांची घोषणा करण्यापूर्वी गोव्याची १५ ते २० वर्षे सेवा केलेल्या या २२० गोमंतकीयांना न्याय द्यावा. हे केवळ फाईलवरील आकडे नसून त्यांच्या मागे कुटुंबे, उपजीविका आणि नागरिकांचे आयुष्य आहे. त्यांना सन्मान आणि नोकरीची सुरक्षा मिळणे आवश्यक आहे, असे पाटकर यांनी म्हटले. २० वर्षे ही तात्पुरती सेवा असू शकत नाही.