

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठल्याने गोव्यातील सोन्याच्या खरेदीवर मंदी आली आहे तसेच मोठा परिणाम झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरेदीत सुमारे ३० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती राज्यातील सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहक सध्या सोन्याच्या खरेदीपासून दूर राहत असल्याचे चित्र दिसत आहे.
सराफ व्यावसायिकांच्या मते, गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे अनेक ग्राहकांनी खरेदीचे निर्णय पुढे ढकलले आहेत. काही ग्राहक महागड्या दागिन्यांऐवजी कमी वजनाच्या दागिन्यांना पसंती देत आहेत, तर काहीजण सध्या खरेदी टाळत आहेत.
दागिन्यांबरोबरच गुंतवणुकीसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सोन्याच्या बिस्किटे आणि नाण्यांच्या मागणीतही घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आर्थिक अनिश्चितता आणि वाढत्या किमतींमुळे ग्राहक अधिक सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक खर्च टाळून विवेकपूर्ण आर्थिक नियोजन करण्याचे आवाहन केल्यानंतर सोन्याच्या खरेदीबाबतही ग्राहक अधिक विचारपूर्वक निर्णय घेत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
सोन्याची मागणी कमी होत असताना चांदीकडे मात्र ग्राहकांचा कल वाढत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी नमूद केले. अलीकडील महिन्यांत चांदीच्या किमतींनीही महत्त्वाचे टप्पे पार केले असले तरी, सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक परवडणारी असल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांकडून तिची मागणी वाढत आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, आगामी सणासुदीचा हंगाम आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरांमध्ये काहीशी स्थिरता आल्यास बाजारपेठेत पुन्हा खरेदी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी विक्रमी दरांमुळे गोव्यातील सोन्याचा बाजार मंदावल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.