

पणजी : पुढारी वृत्तसेवा
हवामान खात्याने केरळमध्ये आज (दि. ४) मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे वातावरण अनुकूल राहिल्यास गोव्यात पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून पोहचण्याची शक्यता खात्याने वर्तविली आहे.
दरवर्षी केरळमध्ये मान्सून जूनच्या सुरुवातीला दाखल होतो. मात्र यावर्षी त्याला तीन दिवस उशीर झाला आहे. हा मान्सून त्यानंतर गोव्यामध्ये सरकतो. सामान्यतः मान्सून ७ जूनपर्यंत गोव्यात दाखल होतो.
यंदा केरळमध्ये २६ मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविली होती, मात्र वातावरणीय स्थिती अनुकूल नसल्याने मान्सूनचा प्रवास मंदावला आहे. मागील वर्षी मान्सूनचे केरळमध्ये आगमन ८ दिवस अगोदर म्हणजे २४ मे रोजी झाले होते व त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मान्सून गोव्यात दाखल झाला होता. दरम्यान, राज्यात ४ ते ८ जून दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने 'यलो अलर्ट जारी केला आहे.
गुरुवारी राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण होते, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पावसामुळे राज्यातील तापमानातही घट झाली असून पुढील सहा दिवस कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२४ तासांत ६ मिमी पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस मुरगाव तालुक्यात ३३.२ मि.मी तर काणकोणमध्ये १५.८ मिमी नोंदविण्यात आला.