Porvorim to Merces traffic jam | पर्वरी ते मेरशी वाहतूक कोंडी सुटणार कधी?

Porvorim to Merces traffic jam- नव्या उड्डाणपुलानंतरही प्रश्न कायम; सात मिनिटांच्या जागी लागतो अर्धा तास
Goa news
पर्वरी : अटलसेतू एक्झिट पॉईंटजवळील वाहतूक कोंडी. पणजी-बांबोळी मार्गावर मेरशी जंक्शनदरम्यान झालेली वाहतूक कोंडी. (छाया: समीर नार्वेकर)
Published on: 
Updated on: 

पणजी : क्रांतिराज सम्राट

पर्वरीतील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरही पणजी आणि विशेषतः मेरशी जंक्शन येथील वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. सामान्य परिस्थितीत मेरशी ते पणजी बसस्थानक हे अंतर पाच ते सात मिनिटांत पार करता येते. मात्र, सकाळी आणि सायंकाळी वाहनांची संख्या वाढली की, याच अंतरासाठी २० ते ३५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. अशीच परिस्थिती अलीकडे पर्वरीतही अनुभवास येत आहे.

नव्या उड्डाणपुलावरील दुचाकी वाहतूक बंद करताना पुलावरील आगमन आणि निर्गमन मार्गही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्वरीतून अटलसेतूच्या दिशेने वाहतूक करणे वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहे. म्हापसाकडून पणजीच्या दिशेने येणारी वाहने आणि मालवाहतुकीमुळे पर्वरीत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.

ही कोंडी टाळण्याबरोबरच पर्वरीवासीयांना वाहनांच्या सततच्या गोंगाटापासून काही प्रमाणात दिलासा मिळावा, या उद्देशाने सहा पदरी उड्डाणपूल उभारण्यात आला. त्यामुळे गिरी ते अटलसेतू एक्झिट पॉईंटपर्यतच्या सुमारे ५.१८ किलोमीटरच्या मार्गावर ७पदरी वाहतूक होणे अपेक्षित आहे. मात्र, नव्या उड्डाणपुलामुळे पर्वरीतील काही मार्गावरील वाहतूक बंद झाल्याने पणजीत येण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

दुसरीकडे, अटलसेतूवरून येणारी वाहने मेरशी येथे महामार्गावर खाली उतरतात. याच ठिकाणी असलेल्या बॉटलनेकमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. केवळ येथील वाहतूक सिग्नल पार करण्यासाठी वाहनचालकांना कधीकधी तासनतास कोंडीत अडकून राहावे लागते रुग्णवाहिकांनाही याला अपवाद ठरता येत नाही.

मेरशी जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापन, सिग्नल यंत्रणेतील अडथळे आणि महामार्गावरून शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी संख्या यामुळे येथे बॉटलनेक निर्माण होते. कार्यालये आणि शाळा सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

येथे सिग्नल यंत्रणा आहे; मात्र कोणता सिग्नल कोणत्या दिशेसाठी किती सेकंद सुरू राहणार, याबाबत सूचना फलक नाहीत. तसेच लेन निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनचालक मोकळ्या जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी वाहतूक कोंडीला सुरुवात होते.

जुन्या मार्गावरून छोटी-मोठी वाहने पणजी, म्हापसा आणि कळंगुट्च्या दिशेने ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर मालवाहतुकीपेक्षा प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. ओ-कोकेरो सर्कल येथेही वाहने अडकून पडतात. येथे सिग्नल यंत्रणा नसली तरी वाहतूक पोलिस तैनात असतात. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होते.

Goa news
Golden Goa-राज्याला 'गोल्डन गोवा' करणार

दरम्यान, नव्या उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांना पर्वरी शहरात प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र निर्गमन मार्ग उपलब्ध नाही. पुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग तपासण्यासाठी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वाहतूक पोलिसही लक्ष ठेवून असतात.

Goa news
Goa bulk waste generators| राज्यात ४१२ मोठ्या कचरा उत्पादकांची नोंद

सूचना फलकांमुळे गोंधळ

मेरशी जंक्शनवरील वाहतूक कोंडीचा परिणाम पर्वरीतील अटलसेतू एक्झिट पॉईंटजवळही जाणवतो. येथे खोळंबलेली वाहने अचानक वेगाने म्हापसाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात, त्याचवेळी तयार करण्यात आलेल्या मार्गिकतून म्हापसाच्या दिशेने जाणारी वाहने प्रवेश करत असल्याने त्यांचा वेग मंदावतो आणि शहराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील वाहने अडकून पडतात. येथे लावण्यात आलेले सूचना फलकही वाहनचालकांसाठी गोंधळात टाकणारे ठरत आहेत.

'मोटरसायकल प्रवेश बंद' असा फलक आहे; मात्र कोणत्या मार्गावर दुचाकींना प्रवेश बंद आहे, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. पुलाच्या मुखाशी वाहने डावीकडे वळविण्याची सूचना आहे; परंतु कोणत्या वाहनांनी डावीकडे वळावे, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे नव्या उड्डाणपुलावरून जाण्याचा प्रयत्न धोकादायक वाटत असल्याने काही वेळ थांबून वाहनचालक पुन्हा जुन्या महामार्गाचा वापर करणे पसंत करतात.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या मार्गावर पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. बांबोळीहून पणजीच्या दिशेने येणाऱ्या हलक्या वाहनांना कोंडी टाळण्यासाठी जीएमसी-सांताक्रूझ अंतर्गत मार्गाचा वापर करता येणे शक्य आहे. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत पर्वरी, म्हापसा, फोंडा आणि बांबोळीच्या बाजूने सरकारी व खासगी कर्मचारी, व्यावसायिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने पणजी शहरात प्रवेश करतात. त्याचप्रमाणे सायंकाळी कार्यालये, बँका आणि शाळा-महाविद्यालये सुटल्यानंतर शहरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होते. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या कदंब व खासगी बसेसमुळे वाहतूक आणखी मंदावते

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज

राष्ट्रीय महामार्गावरून दररोज सुमारे ७० ते ८० हजार वाहने ये-जा करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात येते. त्यामुळे पर्वरीतील साई सर्व्हिस सर्कलजवळ आणि मांडवी पुलाजवळ एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात येथील वाहतूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मात्र, या ठिकाणची सिझल यंत्रणा बंद पडल्यास त्याचा परिणाम इतर मार्गावरील वाहतुकीवरही होतो. वाहतुकीचे वाढते प्रमाण आणि वाहनांचा वेग लक्षात घेता पर्वरीतील उड्डाणपुलाखालील वाहतूक सिग्रल आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हे सिझल वाहनचालकांना स्पष्टपणे दिसतील, अशा पद्धतीने बसविण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news