

पणजी : पुढारी वृत्तसेवा
फोंडा पोटनिवडणूक पुढील आठवड्यात जवळ येऊन ठेपली असून, त्याचा प्रचारही जोरदार सुरू आहे. या पोटनिवडणुकीला आव्हान दिलेल्या याचिकेवरील निवाडा उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. निवाडा सोमवार, ६ एप्रिल रोजी खंडपीठाकडून दिला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक १५ मार्च २०२७ पर्यंत होणार आहे.
मात्र, फोंडा पोटनिवडणूक होऊन नवनिर्वाचित आमदाराचा कार्यकाळ एका वषपिक्षा कमी असल्याने दोन मतदारांनी त्याला आव्हान दिले आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार हा कार्यकाळ आमदाराची जागा रिक्त झाली, तेव्हापासून की उमेदवार निवडून येऊन आमदार होतो त्या तारखेपासून हा कार्यकाळ गृहित धरला जावा यावरून गोवा खंडपीठात हल्लीचा युक्तिवाद झाला.
काही कायदे तज्ज्ञांच्या मते कायद्यानुसार हा कार्यकाळ किमान एक वर्षाचा असायला फोंडा हवा. त्यामुळे ही पोटनिवडणूक होणार की रद्द होणार, याचीच चर्चा फोंडा मतदारसंघातील मतदारांमध्ये आहे. उच्च न्यायालयाने पोटनिवडणूक रद्द केली किंवा याचिकादाराची आव्हान याचिका फेटाळली, तर त्याला आव्हान देण्यास काही दिवसच बाकी आहेत.
१७१ जणांनी बजावला टपाल मतदानाचा हक्क...
पोटनिवडणुकीसाठी टपाल मतदानाची (पोस्टल बॅलट) प्रक्रिया पूर्ण झाली असून, नोंदणी केलेल्या एकूण १७६ मतदारांपैकी १७१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित पाच मतदारांना आता नियमानुसार ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार नाही, अशी स्पष्ट माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज फोंड्यात जाहीर सभा
फोंडा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी सोमवार, ६ एप्रिल रोजी गोव्यात येणार आहेत. त्यांची फोंडा येथे जाहीर सभा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फोंडा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत ते पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ मतदारांना संबोधित करणार आहेत.