

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी विधानसभा मतदारसंघ हा गोव्यातील तुलनेने नव्याने निर्माण झालेला मतदारसंघ असून, त्याची निर्मिती २००८ साली झाली. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ अस्तित्वात आला. पहिल्याच निवडणुकीत अपक्ष उमेदवार रोहन खंवटे यांनी भाजपचे उमेदवार गोविंद पर्वतकर यांचा अवघ्या १०१ मतांनी पराभव करत विजय मिळवला. याच विजयातून पर्वरी मतदारसंघात रोहन खंवटे यांच्या राजकीय वर्चस्वाची सुरुवात झाली आणि हा त्यांचा बालेकिल्ला झाला.
या २०१२ पूर्वी पर्वरी मतदारसंघाचा हा भाग हळदोणा मतदारसंघाशी निगडित होता. त्यामुळे मतदारसंघावर युनायटेड गोवन्स पार्टी, मगो, काँग्रेस आणि भाजप असा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे वर्चस्व राहिलेले आहे. शिवाय पर्वरी हा राज्यातील नवीन शहरी मतदारसंघ म्हणून उदयाला येत आहे.
गोवा विधानसभा संकुल, उच्च न्यायालय संकुल, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कार्यालय, शिक्षण संचालनालय, लेखा संचालनालय आणि गोवा गृहनिर्माण मंडळ यासारखी राज्यातील प्रमुख सरकारी व प्रशासकीय कार्यालय पर्वरीमध्ये आहेत. त्यामुळे पर्वरी मतदारसंघ विशेषतः पेन्ह दी फ्रान्स पंचायतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण बहुतांश प्रकल्प हे याच पंचायत क्षेत्रातील जमिनीवर उभे राहिलेले आहेत.
पर्वरी हा मतदारसंघ पेन्ह दी फ्रान्स, साल्वादोर द मुंद आणि सुकूर या तीन पंचायत क्षेत्रांचा मिळून बनला आहे. राज्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींमध्ये या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा क्रमांक लागतो. प्रत्यक्षात पर्वरी हा भाग या तिन्ही पंचायत क्षेत्रासह पिळर्ण मार्रा, सांगोल्डा आणि बेती या गावांनी व्यापलेला आहे. २०१२ नंतर मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि त्याचा परिणाम २०१७च्या निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आला.
त्या निवडणुकीतही रोहन खंवटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवत भाजपचे गुरुप्रसाद पावसकर यांचा तब्बल ४२१३ मतांनी पराभव केला. सलग दोन वेळा अपक्ष म्हणून मिळवलेल्या विजयामुळे पर्वरी मतदारसंघावर त्यांचे मजबूत नियंत्रण निर्माण झाले. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रोहन खंवटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.
या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे संदीप वझरकर आणि काँग्रेसचे विकास प्रभूदेसाई यांचा ७९५० इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला. खंवटे यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्क्यामुळे हा मतदारसंघ सध्या भाजपसाठी जमेची बाजू मानला जात आहे. सध्या पर्वरी मतदारसंघात रोहन खंवटे यांचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते.
त्यामागे केवळ विकासकामे नाहीत, तर त्यांनी गेल्या अनेक वर्षांत उभी केलेली मजबूत संघटनात्मक रचना हेही मोठे कारण आहे. २०१२ च्या पहिल्या निवडणुकीपासूनच सुहास मोरजकर स्थानिक तरुणांचा मोठा गट त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. त्याचबरोबर पंचायत स्तरावरही त्यांनी आपले समर्थक निवडून आणत स्थानिक पातळीवर मजबूत पकड निर्माण केली.
सुकूरचे माजी सरपंच संदीप वारकर यांची पूर्वी आमदार रोहन खंवटे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख होती. मात्र गेल्या निवडणुकीपूर्वी त्यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी खंवटे यांच्याशी फारकत घेत तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. याच दरम्यान संदीप वारकर यांना सेरुला कोमुनिदाद जमीन फसवणूक आणि इतर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती.
सध्या वझरकर हे सार्वजनिक जीवनातून दूर झाल्याचे चित्र दिसत असले तरी ते मतदारांच्या गुप्तपणे संपर्कात आहेत. काँग्रेस नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने काँग्रेसची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्नही आगामी काळात त्यांच्याकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खवंटे हे भाजपतर्फे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनाच उमेदवारी मिळेल, अशी भाजप कार्यकर्त्यांची खात्री आहे
वझरकरांचे काम सुरूच
काँग्रेसचे विकास प्रभूदेसाई यांनी २०२२ च्या निवडणुकीनंतर मतदारसंघात सातत्याने काम सुरू ठेवले आहे. 'पर्वरी वेल्फेअर फाउंडेशन'च्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. २०२२ मध्ये त्यांना ३५९५ मते मिळाली होती. रोहन खंवटे आणि विकास प्रभू देसाई यांच्यातील मतांचा फरक मोठा असला, तरी तेच काय ठेवणे हे आव्हानात्मक असेल.
... तरच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता
२०१२ मध्ये जशी भाजप आणि खंवटे यांच्यात थेट लढत झाली होती, तसे वातावरण पुन्हा निर्माण झाले तर राजकीय समीकरणे बदलू शकतात. आगामी निवडणुकीत खंवटे यांच्या समोर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे तगडे आवाहन उभे राहण्याची शक्यता दिसत असली तरी सध्या मात्र खंवटे यांनी उभारलेले राजकीय 'चक्रव्यूह' भेदणारा प्रभावी चेहरा या मतदारसंघात दिसत नाही. त्यामुळे २०२७ पर्यंत तरी पर्वरीचा किल्ला त्यांच्या ताब्यात राहण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र सध्या दिसून येते.