

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यात चारही जिल्हा पंचायत मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ७८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान पेडणे तालुक्यात झाले आहे. मतदान दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळपासूनच प्रत्येक बुथवर उस्फूर्तपणे मतदारांनी रांगेत उभे राहून मतदान केले.
देऊळवाडा कोरगाव येथील मतदान केंद्रात एका ठिकाणी दोन बूथ असल्याने त्या ठिकाणी मात्र सायंकाळी ५ नंतरही रांग लागलेली होती. या ठिकाणी सकाळपासूनच मतदान मतदारांनी रांगेत राहून केले.
हरमल या महिलांसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदारांनी मतदान केले. एकूण १२८३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ७९.८८ टक्के मतदान झाले.
धारगळ मतदारसंघात एकूण १२,३७९ मतदारांनी मतदान केले. या मतदार संघात ७६.४० टक्के मतदान झाले. तोरसे या ओबीसीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात ११,४४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या मतदारसंघात ७६.०१ टक्के मतदान झाले. मोरजी या ओबीसी महिलासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात एकूण ११३०३ मतदारांनी आपला हक्क बजाविला.
या मतदारसंघात ७२.६६ मतदान झाले. पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघात प्रत्येक बुधवार भाजप मगोच्या उमेदवारांचे यंत्रणा काम करताना दिसून येत होती.
मात्र अपक्ष उमेदवारांची यंत्रणा कमी पडल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पेडणे तालुक्यात पाहता चारही मतदारसंघात भाजप मगो युतीचे उमेदवार निवडून येण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
युतीचे उमेदवार विजयी होणार :
सोपटे भाजप मगो पक्षाची युती असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत होणार तसेच भाजप पक्षाकडे कार्यकर्ते आहे. या संघटनेचा मोठा उपयोग मतदानावेळी प्रत्येक निवडणुकीत होत असतो. पेडणे तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत जागेवर आमचे उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास माजी आमदार दयानंद सोपटे यांनी व्यक्त केला.
चारही जागावर विजय निश्चित :
आमदार आरोलकर आमदार जीत आरोलकर म्हणाले की, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चारही मतदारसंघात मिळालेला आहे. त्यामुळे मतदाराने दाखवलेला विश्वास त्यातून आमचा विजय निश्चित आहे. चारही मतदारसंघात भाजप युतीचे उमेदवार निवडून येणार असल्याचे निश्चित आहे.
पेडणे तालुक्यात कमळ फुलणार :
आमदार आलेकर आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले की, पेडणे तालुक्यात चारही मतदारसंघात युतीचे उमेदवार निवडून येणार आहेत. त्यामुळे पेडणे तालुक्यात कमळ निश्चित फुलणार आहे. कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि मतदारांनी दाखवलेला पक्षावर विश्वास त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.